श्रीगोंद्यात प्रस्थापितांची एकाधिकारशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:37+5:302021-07-28T04:22:37+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंद्यातील प्रस्थापित नेते एकाधिकारशाही वापरून सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवून मनमानीपणे काम करीत आहेत. त्यामुळे ...

श्रीगोंद्यात प्रस्थापितांची एकाधिकारशाही
श्रीगोंदा : श्रीगोंद्यातील प्रस्थापित नेते एकाधिकारशाही वापरून सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवून मनमानीपणे काम करीत आहेत. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे. विकासाचा रुतलेला रथ बाहेर काढण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये वज्रमूठ बांधण्याचा दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे.
श्रीगोंदा येथील कुकडी शासकीय विश्रामगृहावर सोमवारी तालुक्यातील विविध राजकीय संघटनांत काम करणाऱ्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. श्रीगोंदा तालुक्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी एक समविचारी व्यासपीठ स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. माजी नगराध्यक्ष एकनाथ आळेकर म्हणाले, सर्वांनी एकोप्याने समाजाचे प्रश्न सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्यास तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळेल.
कुकडी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के म्हणाले, आपण सर्व समविचारी नेते आहोत. या स्थापन होणाऱ्या मंचाच्या माध्यमातून तालुक्यातील कुकडी व घोडचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे तालुक्यातील रस्ते, वीज, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, विद्यार्थी व युवकांचे प्रश्न या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ म्हणाले, आपण सर्वच सामान्य कार्यकर्ते आहेत; परंतु सर्वांची जनतेशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे तालुक्यातील धनदांडग्या मातब्बर नेत्यांच्या विरोधात आपण सर्वांनी मोट बांधायची आहे.
संघर्ष क्रांती सेवा संघाचे अध्यक्ष प्रशांत दरेकर म्हणाले, तालुक्यात पहिल्यांदाच विविध सामाजिक संघटनेत काम करणारे नेते व कार्यकर्ते समविचारी मंचावर एकत्र आले आहेत. या तालुक्यातील नेते सर्वसामान्यांचे नेतृत्व मोडीत काढीत वाटाघाटीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.
या बैठकीला विक्रम शेळके, संतोष इथापे, माऊली मोटे, अनिल भुजबळ, भाऊसाहेब मांडे, भूषण बडवे, राजेंद्र नीळकंठ नागवडे, सुनील गायकवाड, बळीराम बोडखे, रघुनाथ सूर्यवंशी, प्रा. योगेश मांडे, दत्तात्रय जामदार, रमेश गिरमे, सुभाष दरेकर, संतोष शिंदे, शहाजी कोरडकर, भीमराव नलगे, राजेंद्र खरात, शिवराज ताडे, अनिल कोरडकर, अमोल गायकवाड, महादेव म्हस्के, अक्षय वागस्कर, अक्षय म्हस्के, प्रमोद म्हस्के उपस्थित होते.