स्थायी सदस्य नियुक्तीला १० फेब्रुवारीचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:07+5:302021-02-06T04:37:07+5:30

अहमदनगर : महापालिका स्थायी समितीत नव्याने आठ सदस्य नियुक्त करण्यासाठी अखेर महापौर बाबासाहेब वाकळे हे राजी झाले असून, सदस्य ...

Moment of appointment of permanent members on 10th February | स्थायी सदस्य नियुक्तीला १० फेब्रुवारीचा मुहूर्त

स्थायी सदस्य नियुक्तीला १० फेब्रुवारीचा मुहूर्त

अहमदनगर : महापालिका स्थायी समितीत नव्याने आठ सदस्य नियुक्त करण्यासाठी अखेर महापौर बाबासाहेब वाकळे हे राजी झाले असून, सदस्य नियुक्तीसाठी येत्या १० फेब्रुवारी रोजी सभा बोलविण्यात आली आहे. सदस्य नियुक्तीनंतर सभापती पदाची निवडणूक जाहीर होणार असल्याने पुढचा सभापती कोण, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महापालिका स्थायी समितीतील निम्मे म्हणजे आठ सदस्य सोमवारी निवृत्त झाले आहेत. स्थायी समितीत १६ सदस्य असतात. प्रत्येक वर्षी निम्मे आठ सदस्य सोडतीद्वारे निवृत्त केले जातात. उर्वरित आठ सदस्य दोन वर्षांनी निवृत्त होतात. त्यानुसार सेनेचे तीन, राष्ट्रवादी व भाजपचे प्रत्येकी दोन सदस्य निवृत्त झाले आहेत. याशिवाय बहुजन समजा पार्टीचे माजी सभापती तथा सदस्य मुद्दसर शेख हेही निवृत्त झालेले आहेत. निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नेमणूक करण्यात येत असून, स्थायी समितीवर सदस्य म्हणून जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता स्थायी समितीत सेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ५ सदस्य आहेत. भाजपचे ४, तर काँग्रेस व बसपाचे प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. सेना व राष्ट्रवादीचे सर्वाधिक संख्याबळ असले तरी पहिल्या वर्षी बसपाचे मुद्दसर शेख हे सभापती झाले होते. दुसऱ्या वर्षी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर हे राष्ट्रवादीकडून सभापती झाले. राज्यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. कोतकर हे सभापती झाले, त्यावेळी सेनेने माघार घेतली होती. त्यामुळे कोतकर हे बिनविरोध सभापती झाले. त्याबदल्यात आता सेनेकडून सभापती पदावर दावा केला जाऊ शकतो. तसेच काँग्रेसचे चार नगरसेवक आहेत; परंतु काँग्रेसला सत्तेत वाटा मिळालेला नाही. काँग्रेसकडून सुप्रिया जाधव स्थायी समतीच्या सदस्या आहेत. सेना व राष्ट्रवादीच्या वादात जाधव यांची सभापती पदाची वर्णी लागू शकते, असे बोलले जाते.

....

असे नियुक्त केले जाणार नवीन सदस्य

शिवसेना-३, राष्ट्रवादी-२, भाजप-२, बहुजन समाज पार्टी-१

....

सभापती निवडणुकीची अशी आहे प्रक्रिया

- स्थायी समितीत नव्याने आठ सदस्य नियुक्त केल्याचा महापौरांची स्वाक्षरी असलेला ठराव सादर करणे.

- आयुक्तांच्या मान्यतेने सभापती पदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केला जाईल.

- विभागीय आयुक्तांकडून सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.

...

सभा सभागृहातच होणार

कोरोच्या पार्श्वभूमीवर नगरसचिव कार्यालयाने सुरुवातीला ॲपद्वारे सभेत सहभागी होण्याबाबत सदस्यांना कळविले होते; परंतु त्यात बदल करून थेट सभागृहातच सदस्य नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला असून, तसे निरोप सदस्यांना देण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Moment of appointment of permanent members on 10th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.