‘जय मातादी’च्या जयघोषाने मोहटागड दुमदुमला

By Admin | Updated: September 28, 2014 23:27 IST2014-09-28T23:19:42+5:302014-09-28T23:27:23+5:30

पाथर्डी : नवरात्रौत्सवाची चौथी माळ व रविवार सुट्टीचा दिवस या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मोहटादेवी गडावर रविवारी भाविकांच्या गर्दीने उच्चांक केला.

Mohatagad Dumdum from Jai Matadi | ‘जय मातादी’च्या जयघोषाने मोहटागड दुमदुमला

‘जय मातादी’च्या जयघोषाने मोहटागड दुमदुमला

पाथर्डी : नवरात्रौत्सवाची चौथी माळ व रविवार सुट्टीचा दिवस या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मोहटादेवी गडावर रविवारी भाविकांच्या गर्दीने उच्चांक केला. शनिवारपासूनच नगर-पाथर्डी, शेवगाव-पाथर्डी व बीड-पाथर्डी हे रस्ते पायी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे फुलून गेले होते. ‘जय जय मातादी, जय मातादी’ च्या घोषणांनी मोहटागड दुमदुमुन गेला होता.
रस्ते गजबजले
गडाच्या पायथ्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. देवस्थान समितीने दर्शनबारीची व्यवस्था चांगल्या पध्दतीने केल्यामुळे गर्दी असूनही भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले. गडाच्या जीर्णोध्दाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. देवीचा गाभारा मोठा असल्यामुळे हजारो भाविक एकाचवेळी दर्शन घेऊ शकतात. पहाटेपासून भाविकांनी गडावर मोठी गर्दी केली होती. रात्रभर पायी येणाऱ्या भाविकांमुळे रस्ते गजबजून गेले होते. पायी येणाऱ्या भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीेय आहे.
देवस्थान समितीचे अध्यक्ष, जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले, पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश शिवाजी केकाण, विश्वस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आदी गर्दीवर लक्ष ठेवून होते. भाविकांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. गडाच्या पायथ्यापासून अलिकडेच वाहने अडविण्यात आली होती. खासगी वाहने तसेच एस.टी.बस., देवस्थान समितीच्या वाहनामधून तसेच पायी भाविक मोठ्या प्रमाणावर आले होते.
(तालुका प्रतिनिधी)
देवीची मंदिरे भाविकांनी फुलली
शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भाविनिमगाव, अमरापूर, तळणी, लखमापुरी, घोटण, कांबी, बालमटाकळी, सामनगाव आदी गावांमधील देवींची मंदिरे भाविकांनी फुलली आहेत.
2भाविनिमगाव, सामनगाव, तळणी येथे श्री जगदंबा माता, अमरापूर येथे रेणुकामाता, लखमापुरी व कांबी येथे महालक्ष्मी, बालमटाकळी येथे बालंबिका, घोटण येथे कालिका मातेचे मंदिर आहे.
3भाविनिमगाव येथे जगदंबा देवीचे जागृत देवस्थान असून मंदिराचा अहिल्याबाई होळकर यांनी
जीर्णोध्दार करुन चांदीचा कमरपट्टा देवी चरणी अर्पण केला. देवीचा मुखवटा सहा फूट रुंद, डोक्यावर २१ कि.ग्रॅ. वजनाचा चांदीचा टोप
आहे.
4कांबी येथे महालक्ष्मी देवीचे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर आहे. लखमापुरी येथील ऐतिहासीक महालक्ष्मी देवीचे मंदिर व प्राचीन रणखांब प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवितात. तळणी येथील जगदंबा मंदिराचा सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धूत यांच्या पुढाकाराने जीर्णोध्दार झाला आहे. नवरात्रौत्सवात सुरु झालेल्या उत्सवाची कोजागिरी पौर्णिमेला सांगता होते.
5अमरापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थानच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र महोत्सव व शतचंडीका यज्ञ महोत्सव सुरु आहे. भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्यानमालेस विविध स्पर्धांची जोड दिल्याने येथे भाविकांची गर्दी वाढली आहे.

Web Title: Mohatagad Dumdum from Jai Matadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.