‘आई राजा उदो उदो’च्या गजरात मोहटादेवीची घटस्थापना
By Admin | Updated: October 2, 2016 00:59 IST2016-10-02T00:51:24+5:302016-10-02T00:59:36+5:30
पाथर्डी : तालुक्यातील मोहटादेवी गडावर शनिवारी सकाळी देवस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्याहस्ते उत्साहाच्या मंगलमय वातावरणात तसेच मंत्रोच्चाराच्या जयघोषात घटस्थापना झाली.

‘आई राजा उदो उदो’च्या गजरात मोहटादेवीची घटस्थापना
पाथर्डी : तालुक्यातील मोहटादेवी गडावर शनिवारी सकाळी देवस्थानच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्याहस्ते उत्साहाच्या मंगलमय वातावरणात तसेच मंत्रोच्चाराच्या जयघोषात घटस्थापना झाली. यावेळी उपस्थित भाविकांनी जय मातादीच्या घोषणा दिल्या. पाऊस असतांनाही सकाळपासून भाविक मोठया संख्येने गडावर आले होते.
सकाळी मोहटा गावातून देवीच्या मुखवटयाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी देवीला सुवर्णालंकार घालण्यात आले. मिरवणुकीत शाळकरी मुले-मुली तसेच गावातील व परिसरातील नागरिक मोठया संख्येने हजर होते. सकाळी अकराच्या सुमारास देवस्थानच्या अध्यक्षा सुवर्णा केवले यांच्या हस्ते विधीवत पूजा करून घटस्थापना झाली. देवस्थानचे पुजारी बबन देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पौरोहित्य केले. यावेळी विश्वस्त अरूण वराट,प्रसन्न दराडे,गोरक्ष ओव्हळ, बाबासाहेब दहिफळे ,रामकिसन फुंदे, शुभांगी खाडे आदींसह मोठया संख्येने भाविक हजर होते.
मोहटादेवी गडावर पायी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पायी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्यासाठी शहरातील मंडळे सज्ज झाली आहेत. भाविकांसाठी मोफत चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोहटादेवी गडाबरोबर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील धामणगांव देवी, शहरातील तिळवण तेली समाजाची देवी , चौंडेश्वर देवी, गाडगे आमराई आदींसह तालुक्यातील विविध गावात घटस्थापना मोठया उत्साहात करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीने सर्व नियोजन केले आहे. दर्शनबारीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर परीसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. भाविकांना प्रसादाची व्यवस्था केली आहे. नऊ दिवस गडावर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
-सुवर्णा केवले, अध्यक्षा, मोहटादेवी देवस्थान.
केडगावच्या रेणुकामाता देवी मंदिरात घटस्थापना
केडगाव : नगरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या केडगाव येथील रेणुकामाता मंदिरात आज भक्तिभावाने धार्मिक विधिवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्रेची पहिली माळ असूनही देवी भक्तांच्या पहाटेपासूनच दशर्नासाठी रांगा होत्या.
येथील देवी मंदिरात शनिवारी सकाळी नगरसेवक सुनील कोतकर व त्यांच्या पत्नी रोहिणी कोतकर यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. यानंतर भवानी गुरव व कालभैरवाची पूजा करण्यात आली. कोतकर दांम्पत्याने ध्वजपूजन केले. त्यानंतर धार्मिकविधीने घटस्थापना झाली. मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी गुरव कुटुंबीय, बाबासाहेब कोतकर, माजी सरपंच रघुनाथ लोंढे, दीपक कोतकर आदी उपस्थित होते. पहिली माळ असूनही आणि सकाळपासून पावसाची संततधार असतानाही भाविकांनी पहाटेपासूनच दशर्नासाठी गर्दी केली होती. जास्त गर्दीतही दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान समितीने मुखदशर्नाची सोय केली आहे. मंदिरात रोज पहाटे साडे चार व रात्री साडे नऊला देवीची आरती होणार आहे. शनिवारी (दि. ८) सातव्या माळेला देवीची यात्रा आहे.
(वार्ताहर)