नगरचा मोहरम : रूबाब अन् मर्दानी थाटात सजतो नवसाचा वाघ
By अरुण वाघमोडे | Updated: September 19, 2018 13:24 IST2018-09-19T13:24:29+5:302018-09-19T13:24:45+5:30
गळ्यात फुलांच्या माळा... डोक्यावर मोर पिसारा...दंडाला हिरवा पंचा आणि वाद्यांचा गजर असा रूबाब अन् मर्दानी थाटात सजलेले नवसाचे वाघ सवाऱ्यांच्या दर्शनासाठी निघतात तेव्हा नगरच्या मोहरममध्ये धार्मिक एकतेचे दर्शन घडते.

नगरचा मोहरम : रूबाब अन् मर्दानी थाटात सजतो नवसाचा वाघ
अरूण वाघमोडे
अहमदनगर : गळ्यात फुलांच्या माळा... डोक्यावर मोर पिसारा...दंडाला हिरवा पंचा आणि वाद्यांचा गजर असा रूबाब अन् मर्दानी थाटात सजलेले नवसाचे वाघ सवाऱ्यांच्या दर्शनासाठी निघतात तेव्हा नगरच्या मोहरममध्ये धार्मिक एकतेचे दर्शन घडते.
शहरातील कोठला, दाळमंडई आणि मंगलगेट हवेली परिसरात मंगळवारी मोहरमच्या सातव्या दिवशी नवसांच्या वाघांचाच आवाज घुमला.अगदी १ वर्षे वय असलेल्या मुलापासून ते ३० वर्षांचे तरूणही नवसाचे वाघ बनून धार्मिक परंपरेत सहभागी झाले होते.
मोहरममध्ये नवसाचे वाघ सजवून नवस फेडण्याची ५०० वर्षांची परंपरा असल्याचे मुख्य मुजावर सय्यद रफा वहिदअली यांनी सांगितले. मोठे इमाम हसन आणि छोटे इमाम हुसेन यांची ताबूत सवारी नवसाला पावते अशी लोकश्रद्धा आहे. त्यामुळे सर्वधर्मीय भाविक येथे नवस (मन्नत) बोलतात. माझ्या मुलाला कुठलाही आजार होऊ नये, तो वाघासारखा चपळ आणि तंदुरूस्त रहावा असे मागणे मागून मुलाला वाघासारखे तयार करून वाजतगाजत सवारींच्या दर्शनासाठी नेले जाते. मोहरमच्या सातव्या, आठव्या आणि नवव्या असे तीन दिवस नवसाचे वाघ सवारींच्या दर्शनासाठी नेले जातात. मुलींसाठी केलेला नवस फेडण्यासाठी त्यांच्या डोक्यावर फुले ठेवून सवारींच्या दर्शनासाठी नेले जाते. नगर शहराचा लौकिक वाढविणारा मोहरम देशभरात प्रसिद्ध आहे.
सवारी मिरवणूक
कोठला येथे छोटे इमाम हुसेन, मंगलगेट हवेली येथे मोठे इमाम हसन यांच्या सवारीची स्थापना होते तर सावेडी येथे अली अब्बास यांच्या सवारीची स्थापना होते. शहरात विविध ठिकाणीही सवारींची स्थापना केली जाते. २० सप्टेंबर रोजी कत्तलच्या रात्री सवा-यांची मिरवणूक निघणार आहे. २१ सप्टेंबर रोजी ताबूत सवारी मिरवणूक निघून विसर्जन होणार आहे.
दर्शनासाठी देशभरातील भाविकांची उपस्थिती
मोठे इमाम हसन व छोटे इमाम हुसेन यांच्या सवारींच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. ट्रस्टतर्फे मोहरम यात्रा व सुविधांची व्यवस्था पाहिली जाते. ट्रस्ट पदाधिकारी यात्रा व सुविधाची व्यवस्था पाहतात.
अनेकांना रोजगार
मोहरमनिमित्त नवसाचे वाघ सजविणारे रंगारी, वादक, कापड विक्रेते, फुले व प्रसाद विकणाºया व्यावसायिकांसह छोट्या मोठ्या वस्तू विकणा-यांनाही दहा दिवस चांगला रोजगार उपलब्ध होतो. नवसाचे वाघ रंगविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करत असून, चांगला रोजगार मिळतो असे बाळू आपटे व शंकर गायकवाड या कलाकारांनी सांगितले.