फिरता दवाखाना ठरतोय कर्जतकरांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:33+5:302021-05-23T04:21:33+5:30
कर्जत : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत तालुक्यात ‘फिरता दवाखाना’ या उपक्रमाला तालुक्यातील गावोगावच्या नागरिकांकडून उदंड ...

फिरता दवाखाना ठरतोय कर्जतकरांसाठी वरदान
कर्जत : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत तालुक्यात ‘फिरता दवाखाना’ या उपक्रमाला तालुक्यातील गावोगावच्या नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या चार महिन्यात अनेक लाभार्थ्यांना मोफत घरपोच प्राथमिक उपचार व औषधे देण्यात आली आहेत. कोरोना काळात हा दवाखाना कर्जतकरांसाठी फायदेशीर ठरत आहे. या अभिनव उपक्रमाचे वयोवृद्ध, गर्भवती महिला व विकलांग नागरिकांकडून कौतुक होत आहे.
कोरोनाबाधित रुग्णाला आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी कार्यरत राहून विविध प्रभावी उपाययोजना आमदार रोहित पवार कर्जत तालुक्यात राबवत आहेत. कोरोना काळातील निर्बंधांमुळे काही ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती, गर्भवती महिला यांच्यासह इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास विविध प्रकारे अडथळा येतो. तेव्हा याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या नागरिकांना औषधोपचारांसाठी त्रास सहन करावा लागू नये यासाठी ‘फिरता दवाखाना’ हा उपक्रम चार महिन्यापूर्वी सुरू केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एचडीएफसी बँकेच्या सहकार्यातून कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व बारामती ॲग्रोच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. केवळ इतकेच नव्हे तर व्हॅनमध्ये असणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेद्वारे रक्तदाब, मधुमेह तपासणीही करण्यात येत आहे. आजवर चार महिन्यात कर्जतमधील अनेक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे.
---
२२ कर्जत हॉस्पिटल
कर्जत तालुक्यातील विविध गावात जाऊन रुग्णांच्या घरी मोफत तपासणी व उपचार करताना वैद्यकीय पथक.