मनसे नगरसेवकांचे निलंबन मागे?

By Admin | Updated: December 15, 2015 23:14 IST2015-12-15T23:01:25+5:302015-12-15T23:14:59+5:30

अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलेल्या मनसेच्या तिघा नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या

MNS corporator's suspension? | मनसे नगरसेवकांचे निलंबन मागे?

मनसे नगरसेवकांचे निलंबन मागे?

अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलेल्या मनसेच्या तिघा नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून पुणे येथे राज ठाकरे यांच्यासोबत आज बुधवारी होणाऱ्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीतच नगर शहर संघटनेत फेरबदल होतील, असा दावा नगरसेवकांकडून केला जात आहे.
नगर शहरात किशोर डागवाले, गणेश भोसले, वीणा बोज्जा, सुवर्णा जाधव हे मनसेचे चार नगरसेवक आहेत. त्यातील किशोर डागवाले यांनी सेनेत प्रवेश केला आहे. उर्वरित तिघांचाही सेनेत प्रवेश होईल, असे सूतोवाच डागवाले यांनी केल्यानंतर लगेचच मनसेत हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाने सेनेचे उमेदवार सचिन जाधव यांना मतदान करण्याचा पक्षादेश बजावला होता. मात्र, तो झुगारून मनसेच्या चारही नगरसेवकांनी आघाडीचे अभिषेक कळमकर यांना मतदान केले. कळमकर पुढे महापौर झाले. मात्र पक्षादेश झुगारल्याच्या कारणावरून मनसेच्या चारही नगरसेवकांचे सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन करण्यात आले. आता डागवाले यांनी सेनेत प्रवेश करताच अन्य तिघांचे निलंबन मागे घेण्याच्या हालचाली पक्षीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. पक्षाचे मुंबईतील पदाधिकारी अविनाश अभ्यंकर यांनी तसा निरोप नगरसेवकांना दिला असून पुण्यात बुधवारी भेटीसाठी बोलविण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्यासोबत हे तिन्ही नगरसेवक संवाद साधणार आहेत.
दरम्यान, पक्ष संघटनेतही बदल होणार असल्याच्या वृत्ताने पदाधिकारीही संभ्रमीत झाले आहेत. नगरसेवक एका बाजुला अन् पक्षाचे पदाधिकारी दुसऱ्या बाजुला अशी पक्षाची शहरात परिस्थिती आहे. त्यामुळे पुण्यात राज ठाकरे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)

Web Title: MNS corporator's suspension?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.