अहिल्यानगर : आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देणारा टेक्स्ट मेसेज त्यांचे स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलवर आला आहे. ही घटना बुधवारी (दि. २) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री उशिराने तक्रार देण्यात आली आहे.याबाबत सुहास साहेबराव शिरसाठ (रा. जहागिरदार चाळ, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर ) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने मेसज पाठविला. दो दिन के अंदर आमदार संग्राम जगताप को खत्म करुंगा, अशा आशयाचा हा मेसेज आहे. अधिक तपास कोतवाली पोलिस ठाण्याच्या सहाय्यक फौजदार अमिना शेख करत आहेत. यापूर्वी आमदार संग्राम जगताप व त्यांच्या कुटुंबियांबाबत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आमदार जगताप सध्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबई येथे आहेत.
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 02:49 IST