भारनियमनाविरोधात आमदार जगताप यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 17:19 IST2017-09-14T17:17:24+5:302017-09-14T17:19:19+5:30
अहमदनगर : शहरात होणारे भारनियमन रद्द करण्याचे आश्वासन न पाळल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी महावितरण कार्यालयात गेलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम ...

भारनियमनाविरोधात आमदार जगताप यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या
अहमदनगर : शहरात होणारे भारनियमन रद्द करण्याचे आश्वासन न पाळल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी महावितरण कार्यालयात गेलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना कोतवाली पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेतले. तत्पूर्वी भारनियमन रद्द व्हावे यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोन तास महावितरण कार्यालयात ठिय्या दिला.
शहरात गेल्या चार दिवसांपासून होत असलेले तातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले होते. तब्बल दोन तास वीज बंद करून कार्यालयात कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल्याने अखेर महावितरणकडून गुरूवारपासून (दि. १४) भारनियमन रद्द करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना मिळाले होते. त्यामुळे तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले.
परंतु आश्वासनाप्रमाणे गुरूवारी भारनियमन रद्द न झाल्याने आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेबारा वाजता कार्यकर्त्यांनी पुन्हा अधीक्षक अभियंता कार्यालठ गाठले व भारनियमन रद्द करण्याची मागणी करत ठिय्या दिला. या भारनियमनाची अंमलबजावणी राज्यस्तरावरून असून, स्थानिक अधिका-यांच्या हातात काहीही नाही. त्यामुळे भारनियमन रद्द करण्यास असमर्थ असल्याचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण आदींसह अधिका-यांनी सांगितले. परंतु आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. वाढती घोषणाबाजी व वातावरण चिघळण्याची स्थिती पाहून तेथे उपस्थित कोतवाली पोलिसांनी आ. जगताप यांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे इतर आंदोलकांनीही त्यांच्यामागे कोतवाली पोलिसांत धाव घेतली. अर्ध्या तासानंतर जगताप यांनी सोडून देण्यात आले.