महापालिकेकडून पतसंस्थेच्या पैशांचा गैरवापर
By Admin | Updated: October 5, 2016 00:19 IST2016-10-05T00:07:10+5:302016-10-05T00:19:28+5:30
अहमदनगर : महापालिका पतसंस्थेच्या कर्जापोटी हप्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करायची. मात्र कपात झालेले पैसे पतसंस्थेत भरायचे नाही,

महापालिकेकडून पतसंस्थेच्या पैशांचा गैरवापर
अहमदनगर : महापालिका पतसंस्थेच्या कर्जापोटी हप्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करायची. मात्र कपात झालेले पैसे पतसंस्थेत भरायचे नाही, अशा प्रकारचा गैरव्यवहार महापालिका प्रशासनाने केला आहे. आतापर्यंत तब्बल साडेआठ कोटी रुपयांचा महापालिका प्रशासनाने गैरवापर केला असून आमची रक्कम गेली कुठे?असा सवाल सभासद करीत आहेत.
महापालिकेकडून येणे असलेल्या साडेआठ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मंगळवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. आयुक्तांसोबत सोमवारी झालेल्या बैठकीत दहा लाख रुपये देण्याचा तोडगाही पतसंस्थेने फेटाळला होता.
मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. त्यामध्ये बुधवारी २० लाख आणि आॅक्टोबरअखेर सव्वा कोटी रुपये देण्याचे आयुक्तांनी सांगितले. मार्च २०१७ अखेर सर्व रक्कम अदा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
महापालिका कर्मचारी पतसंस्थेचे सभासद हे महापालिकेतील कर्मचारी आहेत. सभासदांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होतात. आतापर्यंत महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्जाच्या हप्त्यापोटी ८ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम कपात केली आहे. मात्र ही हप्त्याची रक्कम महापालिकेने पतसंस्थेत भरलीच नाही. ही थकबाकी दरमहा वाढत आहे. पतसंस्थेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कॅश क्रेडिट कर्ज घेतले आहे. ही वसुली रखडली असल्याने संस्थेचे हे कर्ज थकले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने संस्थेकडे दंड आकारणी केली आहे. त्याचा ५० ते ५५ लाख रुपयांचा बोजा संस्थेवर पडत आहे. या उपोषणात पतसंस्थेचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, उपाध्यक्ष प्रकाश आजबे, कैलास भोसले, बाबासाहेब मुद्गल, हरिभाऊ शेकटकर, सतीश ताठे, विकास गिते, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब पवार, विलास सोनटक्के, राहुल कोतकर, नंदा भिंगारदिवे, चंद्रकला खलचे, किशोर कानडे, बाळासाहेब गंगेकर, अजय कांबळे यांच्यासह सभासदांनी उपोषणात सहभाग घेतला होता.
(प्रतिनिधी)