गैरसमजुतीमुळे माणसे हसत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:13+5:302021-07-19T04:15:13+5:30

अहमदनगर : निकोप हसल्याने मन व शरीर ताजेतवाने राहते. पण गंभीर असणे हे प्रतिष्ठेचे, विद्ववत्तेचे, साधुत्वाचे लक्षण समजले जाते, ...

Misunderstandings do not make people laugh | गैरसमजुतीमुळे माणसे हसत नाहीत

गैरसमजुतीमुळे माणसे हसत नाहीत

अहमदनगर : निकोप हसल्याने मन व शरीर ताजेतवाने राहते. पण गंभीर असणे हे प्रतिष्ठेचे, विद्ववत्तेचे, साधुत्वाचे लक्षण समजले जाते, अशा गैरसमजुतीमुळे आपली माणसे हसत आनंदाने जगत नाहीत, असे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी सांगितले.

मराठा सेवा संघ व मराठा पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘जगताना विनोदाचे महत्त्व‘ या विषयावर ते बोलत होते. कळमकर म्हणाले, विनोद सत्याचा मित्र असतो. तो हसता हसवता असत्याचे बुरखे फाडतो. सर्व समाज सुखी व आनंदी रहावा, असे ज्याला वाटते. तोच विनोदनिर्मिती करून सर्वांना हसवू शकतो. लबाड व स्वार्थी माणसे दुसऱ्याचे वाटोळे झाले तरच हसतात. इतरांच्या बाबतीत चांगली गोष्ट घडली तर आनंदाने हसणारा मनुष्य खरा मानवतावादी असतो. वागण्यातील कोतेपणा, मुलांची अवास्तव काळजी, संपत्ती कमावण्याचा सोस, राजकीय स्पर्धा, आर्थिक, सामाजिक, जागतिक चिंता उराशी कवटाळून बसल्याने आपली माणसं कायम अस्वस्थ असतात. त्यामुळे भारतीय माणसांची हृदये, मेंदू त्याच्या शारीरिक वयापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी जास्त म्हातारी असतात. यावर खळखळून हसवणारा विनोद हे एकमेव औषध आहे. हसण्याला प्रतिष्ठा नसल्याने माणसे नेहमी ताणतणावात राहतात. दु:खाकडे गांभीर्याने पाहिली की ती वाढतात आणि खेळकरपणे पाहिले की कमी होतात. म्हणून माणसांनी जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पहायला शिकले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास मराठा पतसंस्थेचे संस्थापक इंजिनिअर विजयकुमार ठुबे, संचालक सुरेश इथापे, संपूर्ण सावंत, राजेश्री शितोळे, शोभाताई जाधव, उदयन घुले, काशीनाथ डोंगरे, पोपट काळे, विश्वास करंजकर, अशोक मुठे, नाना मरकड, अशोक वारकड, राजेंद्र ढोणे, पुष्पाताई मरकड, जेष्ठ पत्रकार संजय वाघमारे, राजेंद्र ठणगे आदी उपस्थित होते. स्वागत ज्ञानदेव पांडुळे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर मरकड यांनी केले. आभार राजेंद्र इंगळे यांनी मानले.

.............

‘वन्स मोअर’चा किस्सा

पूर्वीच्या काळी रंगमंचावर नाटक सुरू असताना राजकन्या व इतर दरबारी पुढे बसले होते. विंगेतून एका सुंदर मोराने रंगमंचावर उडी मारली. राजकन्येचे त्याकडे लक्ष नव्हते. तिच्या वहिनीने लक्ष वेधण्यासाठी राजकन्येला सांगितले, ‘वन्सं.. मोर.! तोपर्यंत मोर निघून गेला होता. राजकन्येच्या हट्टापाई मोर पुन्हा रंगमंचावर आणावा लागला. तेव्हापासून एखादी चांगली गोष्ट पुन्हा सादर करण्यासाठी ‘वन्स मोअर’ हा शब्द वापरला जाऊ लागला, असे किस्सा सांगत वन्स मोअर या शब्दनिर्मितीचा मजेशीर किस्सा कळमकर यांनी उलगडला.

Web Title: Misunderstandings do not make people laugh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.