मिरजगावला पावसाने झोडपले
By Admin | Updated: September 4, 2024 14:22 IST2014-09-17T23:42:09+5:302024-09-04T14:22:27+5:30
मिरजगाव : कर्जत तालुक्यातील मिरजगावला मंगळवारी सायंकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले.

मिरजगावला पावसाने झोडपले
मिरजगाव : कर्जत तालुक्यातील मिरजगावला मंगळवारी सायंकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तब्बल दहा वर्षानंतर नद्या, नाले वाहते झाल्याने नगर-सोलापूर महामार्ग सुमारे दोन तास ठप्प झाला होता. एका वाहनाने दिलेल्या धडकेने एका जणाला जीव गमवावा लागला.
मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मिरजगावसह परिसरात सुमारे तीन तास हा पाऊस झाला. या पावसाची नोंद १३६ मि.मी. इतकी झाली आहे. मिरजगावच्या इतिहासात हा विक्रमी पाऊस समजला जातो.
नद्या, नाल्यांना पाणी आल्याने सखल भागात पाणी साचले होते. काही घरांमध्यहीे पाणी शिरल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. छोटे पूल, रस्ते पावसाने वाहून गेले. नगर-सोलापूर महामार्गावरील डुकरी नदीवरील पुलापर्यंत पाणी आले होते. शेतांना तळ्याचे स्वरुप आले होते.
नगर-सोलापूर महामार्गावरील कोकणगावनजीकच्या वागजाई नदीला पूर आल्याने सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. नदीनजीक उभा असलेला ट्रक चालक महंमद मकदूम अब्दूल बलकोनी (वय ३०, रा. बसवाकल्याण जि.बिदर) भरधाव वेगाने आलेल्या पीकअप व्हॅनने (क्र. एम.एच.१६-क्यू ६६३१) जोराची धडक दिल्याने जागीच ठार झाला. घटनेनंतर ही पीकअप व्हॅन रस्त्याच्या कडेला नाल्यात जाऊन उलटली. नदीतील पुरातून पलिकडे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन मोटारसायकली वाहून गेल्या. परंतु यामध्ये जीवितहानी झाली नाही.
(वार्ताहर)