अल्पवयीन मुलीला भिक्षा मागायला लावले

By Admin | Updated: June 11, 2014 00:16 IST2014-06-10T23:30:44+5:302014-06-11T00:16:26+5:30

पाथर्डी : अल्पवयीन मुलीला पळवून आणून तिला भीक मागायला लावण्याचा प्रकार तालुक्यातील कोरडगाव येथील प्रगती महिला गावविकास समितीच्या महिलांनी हाणून पाडला.

A minor girl was asked to beg alms | अल्पवयीन मुलीला भिक्षा मागायला लावले

अल्पवयीन मुलीला भिक्षा मागायला लावले

पाथर्डी : अल्पवयीन मुलीला पळवून आणून तिला भीक मागायला लावण्याचा प्रकार तालुक्यातील कोरडगाव येथील प्रगती महिला गावविकास समितीच्या महिलांनी हाणून पाडला. सदर मुलीला पोलिसांच्या ताब्यात देऊन तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्याची मागणी महिलांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रभान सरोदे यांच्याकडे केली. मुलीची सुटका झाली असली तरी तिला कोणी पळवून आणले व कोठून आणले याचा तपास पोलीस करीत आहेत.
मंगळवारी सकाळी आठ ते नऊ वर्षाची एक मुलगी भीक मागण्यासाठी कोरडगावात आली. ती एक रूपया द्या असे फक्त म्हणायची. यावर गावातील महिलांनी तुला जेवायला देतो, असे सांगताच ती नकार द्यायची. पैसे द्या नाहीतर मला मारतात, असे ती सांगायची. यावर महिलांनी प्रगती महिला गावविकास समितीच्या अध्यक्षा शिवकन्या कचरे यांच्या कानावर हा प्रकार घातला. कचरे यांनी या अल्पवयीन मुलीला विश्वासात घेत तिची चौकशी केली. त्यावेळी सदर मुलीने मला पळवून आणले असून मला भीक मागायला लावल्याचे सांगितले. पैसे आणले नाही तर मला जेवायला देत नाहीत व मारहाण करतात.तसेच माझ्या भावाला सुध्दा पळवून आणले आहे. त्याला मात्र ते मारीत नाहीत तो तेथेच रहातो. मला मात्र माझ्या आईवडिलांकडे जायचे आहे, असे तिने सांगितले. यावर शिवकन्या कचरे यांनी सदर मुलीला पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणले. गावातील संजीवनी देशमुख,चंद्रकला मगर,मंदा माने,सुनीता मुखेकर,पुष्पा काकडे बेबी राऊत आदिंनी बचत गटाच्या कार्यकर्त्या भारती असलकर यांना कोरडगाव येथे बोलावून घेऊन तिला तिच्या आईवडिलांकडे पाठविण्यासाठी मदत करण्याची मागणी केली. शिवकन्या कचरे व भारती असलकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रभान सरोदे यांची भेट घेत मुलीला तिच्या आईवडिलांचा पत्ता सांगता येत नसल्याने तिला स्रेहालय संस्थेत दाखल करावे, अशी विनंती केली. तिच्या आईवडिलांचा तपास लागल्यावर त्यांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी सरोदे यांनी केली. दरम्यान तिला स्रेहालयात दाखल करण्यात येणार आहे.तिला कोणी व कधी व कोठून पळवून आणले तसेच तिचा भाऊ कोणाच्या ताब्यात आहे या गोष्टी पोलिसांनी स्पष्ट केल्या नाहीत. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास आणखी काही मुले आहेत की काय याचा पोलीस तपास करणार का? असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: A minor girl was asked to beg alms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.