मंत्र्यांनी, आमदारांना तालुक्यातील जनतेसाठी कोविड सेंटर उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:19 IST2021-04-14T04:19:27+5:302021-04-14T04:19:27+5:30
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी शिर्डीत बैठक घेऊन साई संस्थानने शेजारच्या तालुक्यांतील रुग्णांवर येथे उपचार करण्याच्या सूचना केल्या ...

मंत्र्यांनी, आमदारांना तालुक्यातील जनतेसाठी कोविड सेंटर उभारावे
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी शिर्डीत बैठक घेऊन साई संस्थानने शेजारच्या तालुक्यांतील रुग्णांवर येथे उपचार करण्याच्या सूचना केल्या होत्या. थोरातांच्या या सूचनेला खा. विखे यांनी आज तीव्र आक्षेप घेतला.
विखे म्हणाले, येथील कोविड सेंटर हाऊसफुल आहे. तालुक्यातील डॉक्टर्स, अधिकारी, ग्रामस्थांनी संस्थानच्या मदतीने शिर्डीत कोविड सेंटर उभारले आहे. त्यामुळे येथील सेंटरवर पहिला अधिकार तालुक्यातील रुग्णांचा आहे. सध्या कोविड सेंटर हाऊसफुल आहे. तालुक्यातील पेशंटला देऊन जागा शिल्लक राहिल्या तर बाहेरच्या रुग्णांबाबत नक्की विचार करू; पण प्रशासनाने बाहेरच्या रुग्णांसाठी बळजबरी केली तर आम्ही तीव्र विरोध करू.
राहाता तालुक्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. बाहेरच्या तालुक्यातून येऊन बैठका घ्या; पण आमचे नियोजन विस्कळीत करू नका. राहाता तालुक्यात आम्ही कुणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही. हवे तर रुग्णांना येथे पाठवण्यासाठी संस्थानशी संपर्क करून त्यांच्या इमारती घ्या. मात्र, रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपल्या तालुक्यातून आरोग्य यंत्रणा आणा, असा सल्लाही खा. विखे यांनी दिला.
................
बैठका घेण्यापेक्षा उपाययोजना करा
मंत्र्यांनी केवळ बैठका घेऊन फोटोसेशन करत अधिकाऱ्यांना सूचना देण्याऐवजी रेमडेसिविर, ऑक्सिजनची स्वत: उपलब्धता करून दाखवा.
केंद्र व राज्य असा वाद निर्माण करू नका. केंद्रात पंतप्रधान मोदी व राज्यात मुख्यमंत्री ठाकरे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रश्नी राजकारण न करता राज्य सरकारला मदत करण्याची आमची भूमिका आहे, असेही विखे म्हणाले.