मंत्रीही माझे फोन टाळतात

By Admin | Updated: August 3, 2014 01:09 IST2014-08-02T23:51:54+5:302014-08-03T01:09:29+5:30

अहमदनगर : मी आयुष्यातले ५३ वर्षे राजकारणात घातले. सर्व पदे उपभोगले. आता कुठलीच राजकीय अपेक्षा राहिली नाही.

The minister also avoids my phone | मंत्रीही माझे फोन टाळतात

मंत्रीही माझे फोन टाळतात

अहमदनगर : मी आयुष्यातले ५३ वर्षे राजकारणात घातले. सर्व पदे उपभोगले. आता कुठलीच राजकीय अपेक्षा राहिली नाही. पण नगर तालुक्यात इतकी भयावह दुष्काळजन्य स्थिती असताना त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांना रोज फोन करतो, पण ते साधा माझा फोनही घेत नाहीत. आता जाऊन त्यांचे पाय धरणार असे उद्विग्न व भावनाविवश प्रतिक्रिया चार वेळा आमदार व दोनदा खासदार राहिलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांनी दिली.
अमृत महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर आलेल्या शेळके यांनी नगर तालुक्यातील निवडक पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून नगर तालुक्यात सातत्याने दुष्काळ पडतो. अकोले तालुका सोडला तर जिल्ह्यात सर्वत्र अशीच दुष्काळजन्य परिस्थिती आहे. तालुक्यातील सर्व पाझर तलाव, नाला बंडींग कोरडे आहेत. पाण्याचे उद्भव ही कोरडेठाक पडलेत. जनावरांना खायला आता चारा राहिला नाही. हे जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांना दिसत नाही का? असा सवाल करून ते म्हणाले की, शेतकरी मेल्यावर हे त्यांच्याकडे लक्ष देणार आहेत का? बाबुर्डी घुमटच्या ग्रामस्थांनी पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जागा दिली. त्याचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून धूळखात पडून आहे. जिल्ह्यातील मंत्र्यांना फोन केला तर साधा माझा फोनही घेत नाहीत. ५३ वर्षे राजकारणात घालून हे माझ्या वाट्याला येत असेल तर सर्वसामान्यांची स्थिती कशी असेल? जनावरांच्या छावण्या, चारा डेपो तातडीने सुरू करण्यासाठी मी आता मुंबईत जाऊन मंत्र्यांचे पाय धरणार आहे. यावेळी शेळके यांचे संपतराव म्हस्के, बाळासाहेब हराळ, किसनराव लोटके, ज्ञानदेव दळवी, मामा भालसिंग, मथुजी आंधळे, सुधीर भद्रे, भगवान बेरड, बाबासाहेब गुंजाळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘गरज सरो वैद्य मरो’
नगर तालुक्याच्या एकीची हाक आता फक्त निवडणुकांसाठी दिली जात आहे. मात्र ‘त्यांच्या’ सोयीचे असले की एकी, काम झाले तर बेकी, अशी गरजेपुरती नगर तालुक्याची एकी मान्य नसल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले.

Web Title: The minister also avoids my phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.