सशस्त्र दरोडेखोरांची टोळी जेरबंद
By Admin | Updated: April 1, 2017 21:00 IST2017-04-01T21:00:05+5:302017-04-01T21:00:05+5:30
चाकूहल्ला करून पिस्तुलाचा धाक दाखवत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटणारी ६ अट्टल दरोडेखोरांची टोळी शनिवारी कोपरगाव तालुका पोलिसांनी पकडली.

सशस्त्र दरोडेखोरांची टोळी जेरबंद
आॅनलाइन लोकमत
कोपरगाव (अहमदनगर), दि़ १ - कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील व्यापारी परिमल चंद्रशेखर भुसारे यांच्यावर चाकूहल्ला करून पिस्तुलाचा धाक दाखवत रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटणारी ६ अट्टल दरोडेखोरांची टोळी शनिवारी कोपरगाव तालुका पोलिसांनी पकडली. या टोळीकडून गावठी कट्यासह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मार्चला रात्री सव्वा नऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या ५-६ दरोडेखोरांनी भुसारे यांच्यावर चाकूने हल्ला करून बंदुकीचा धाक दाखवत रोकड व सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील व तालुका पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पी.वाय कादरी यांनी गुन्ह्याचा तपास केला. हेड कॉन्स्टेबल प्रदीप काशिद, इरफान शेख, असीर सय्यद, अशोक गाढे, अशोक कुदळे, दिगंबर कोळी, किशोर कुळधर यांच्या सहकार्याने ठिकठिकाणी सापळे लावून पोलिसांनी सुनील शांताराम घाडगे (वय २६, रा. अंदरसुल ता. येवला जि. नाशिक), संदीप शांताराम गायकवाड (वय २३, रा.गवंडगाव ता.येवला जि.नाशिक), रविंद्र उर्फ भावड्या त्र्यंबक गोरे ( वय २५ रा.कोंबडवाडी ता.येवला), रणजीत रामभाऊ सोनवणे (वय १९, रा.टाकळी, ता.कोपरगाव ), अनिल रघुनाथ कचरे(वय १९, रा.लक्ष्मीनगर, सावळी विहीर, ता.राहाता), सुरेश उर्फ राजू उत्तम भालेराव (वय ३५, रा. मेंढेगाव ता.चिखली, जि. बुलढाणा ) यांच्या मुसक्या आवळल्या.
वीरगावच्या पंपावरील दरोड्याची कबुली
पोलिसी खाक्या दाखविताच दरोडेखोरांनी वीरगाव (ता.वैजापूर) पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची कबुली दिली. या टोळीने नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हत्याराचा धाक दाखवून अनेकांना लुटल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १ गावठी कट्टा, १ चाकू, २ दुचाकी, ८ मोबाईल, २१ हजारांची रोकड असा एकूण १ लाख २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या दरोडेखोरांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.