पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज लाईनचा मैला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By अरुण वाघमोडे | Updated: May 14, 2023 17:54 IST2023-05-14T17:53:31+5:302023-05-14T17:54:01+5:30
सिद्धार्थनगर येथील विविध नागरी समस्यांची रविवारी शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते बाबूशेट टायरवाले यांनी पाहणी केली.

पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज लाईनचा मैला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अहमदनगर : नगर शहरातील सिद्धार्थनगर परिसरात महापालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने राहतात. मात्र, याच परिसरातील रहिवाशांना नागरी समस्यांचा सामना करवा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात महापालिकेच्या जलवाहिनीतून मैलामिश्रित पाणी येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दलित वस्ती सुधार योजनेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो तरी सिद्धार्थनगर येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केेला आहे.
सिद्धार्थनगर येथील विविध नागरी समस्यांची रविवारी शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते बाबूशेट टायरवाले यांनी पाहणी केली. यावेळी पोपट पाथरे, आनंद शेळके, किशोर पटेकर, पिंटू मोडवे, रामदास ससाणे, प्रवीण घोरपडे, रंगनाथ गाडे, रामदास वैराळ, नाना खरात आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी टायरवाले म्हणाले ड्रेनेज लाईनच्या चेंबरमधून मैलमिश्रित पाणी या परिसरामध्ये सर्वत्र वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. शहर स्वच्छ ठेवणारे मनपा कर्मचारीच आरोग्य समस्येच्या विळख्यात सापडले आहे. ते राहत असलेल्या सिद्धार्थ नगर परिसरामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे साथीचे आजार पसरले आहेत.
येथील समस्यांकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोपट पाथरे म्हणाले की, सिद्धार्थनगरमध्ये मैल मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून मैलामिश्रित पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा महापालिकेवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.