हॉटस्पॉट चितळीत आरोग्यसेविकेने केली मध्यरात्री प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:21 IST2021-05-19T04:21:42+5:302021-05-19T04:21:42+5:30
शिर्डी : कोरोनाच्या भयावह तांडवानंतर दु:ख आणि भीतीचे सावट पसरलेल्या चितळीत मध्यरात्री एका अडलेल्या महिलेची प्रसूती करून आरोग्यसेविकेने रुग्णसेवेचा ...

हॉटस्पॉट चितळीत आरोग्यसेविकेने केली मध्यरात्री प्रसूती
शिर्डी : कोरोनाच्या भयावह तांडवानंतर दु:ख आणि भीतीचे सावट पसरलेल्या चितळीत मध्यरात्री एका अडलेल्या महिलेची प्रसूती करून आरोग्यसेविकेने रुग्णसेवेचा वसा जपला आहे. चितळीतील कोरोनाच्या तांडवात प्रसूती करणाऱ्या या आरोग्यसेविकेचे नाव कल्पना मधुकर बनसोडे असे आहे. गेल्या तेरा वर्षांपासून त्या चितळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा प्रचंड तणावात आहे. कोरोना लसीकरण, बालकांचे नियमित लसीकरण, गरोदर मातांची नियमित तपासणी, सर्वेक्षण व विलगीकरण अशा अनेक कामांत आरोग्य विभाग अविश्रांत मेहनत घेत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री कल्पना बनसोडे कोरोना संबंधित कामकाजाचे रेकॉर्ड अद्ययावत करत होत्या. एवढ्यात स्वाती अरुण दामोधर ही गरोदर माता प्रसूतीच्या कळा देत अवघडलेल्या अवस्थेत उपकेंद्रात दाखल झाली. मोलमजुरी करीत असलेल्या या दाम्पत्याला प्रसूतीसाठी इतर दवाखान्यात जाणे शक्य नाही. कोरोनाच्या भीतीमुळे इतर मदतीचे दारेही बंद आहेत. याची कल्पना बनसोडे यांना क्षणात जाणीव झाली. त्यातच काहीही करा; पण माझ्या बायकोची प्रसूती तुम्हीच करा, अशी विनंती स्वाती यांच्या पतीने केली.
रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या कल्पना बनसोडे यांनी या महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेत तत्काळ आशा वर्कर सुनीता कांबळे यांना मदतीला बोलावले. रात्री वेदनेने तडफडणाऱ्या गर्भवती महिलेला मानसिक आधार देत व उपचार करत या दोघी आरोग्य कर्मचाऱ्यांनी या महिलेची प्रसूती सुखरूप पार पाडली. प्रसूती वेदनेतून मुक्त झालेल्या मातेने व पित्याने कल्पना बनसोडे यांना पानावलेल्या डोळ्यांनी धन्यवाद दिले. प्रसूतीनंतर या घटनेची माहिती कार्यालयीन व्हाॅट्सअॅपवर टाकताच मध्यरात्री साडेबारा वाजता आरोग्याधिकारी डॉ. स्वाती घोगरे (बच्छाव) यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना देत टीमचे कौतुक केले.
..................
महिलेच्या वेदनेने मन गलबलून गेले. सगळी भीती नाहीशी होत कर्तव्याची जाणीव झाली. यामुळेच धाडस करू शकले. या बालकाच्या जन्माने क्षणभर का होईना हॉटस्पॉट झालेल्या चितळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आनंदाची झुळूक अनुभवायला मिळाली.
- कल्पना बनसोडे, आरोग्यसेविका
..................
वाकडीच्या आरोग्याधिकारी डॉ. स्वाती घोगरे, डॉ. घेरडे, सीएचओ नीलेश म्हस्के यांचे मार्गदर्शन व आशा वर्करची मदत मोलाची ठरली.
-डॉ. प्रमोद म्हस्के, तालुका आरोग्याधिकारी
( फोटो आहे)