नगरचा पारा ४१ अंशावर
By Admin | Updated: April 15, 2016 23:20 IST2016-04-15T23:16:30+5:302016-04-15T23:20:46+5:30
अहमदनगर : सातत्याने पडणारा दुष्काळ, खालावलेली भूजल पातळी, तहानलेली आणि भेगाळलेली जमीन, यामुळे यंदा एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकायला लागला आहे.

नगरचा पारा ४१ अंशावर
अंगाची काहिली : थंड पेयांना मागणी
अहमदनगर : सातत्याने पडणारा दुष्काळ, खालावलेली भूजल पातळी, तहानलेली आणि भेगाळलेली जमीन, यामुळे यंदा एप्रिल महिन्यात सूर्य आग ओकायला लागला आहे. परिणामी संपूर्ण नगर जिल्हा तापला असून, पारा ४१ अंशांवर पोहोचला आहे.
मार्च महिन्यात ३५ अंशांपर्यंत राहिलेले तापमान एप्रिल महिन्यात चांगलेच वाढले असून, तीव्र उष्णतेने सर्वांनाच हैराण केले आहे़ उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक शक्यतो सकाळीच कामे आटोपून घेत आहेत किंवा दुपारच्या उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडत आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३५ अंश सेल्सियस एवढे तापमान होते़ दुसऱ्या आठवड्यात पारा थेट ४१ अंशांपर्यंत जावून पोहोचला़ वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी कमालीची घटली असून, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे़ शेतात सध्या कांदा पिकाची काढणी सुरू आहे़
उष्णतेच्या तीव्रतेमुळे काढलेला कांदा खराब होत असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ वाढत्या उष्णतेमुळे शहरात दुपारी रस्त्यावरची वाहतूक रोडावली आहे़ उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक दुपारी घरीच राहणे पसंत करत आहेत़ तर थंडपेयांच्या दुकानात नागरिकांची गर्दी वाढत आहे़ एप्रिलमध्ये ४१ अंशांवर पोहोचलेले तापमान मे महिन्यात आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न आणखी बिकट होणार आहे़
(प्रतिनिधी)
जिल्ह्यात उष्णतेची लाट
एप्रिल महिन्यातील १५ दिवसांचा कालावधी लोटला असून, अजून १५ दिवस बाकी आहेत. चालू आठवड्यात जिल्ह्यातील ९ लाखांहून अधिक जनतेला सरकारी पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. उष्णतेची लाट अशीच कायम राहिल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.