नगरला मोहरमनिमित्त निघणार सवा-यांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 18:50 IST2019-09-08T18:49:28+5:302019-09-08T18:50:22+5:30
नगर शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमची उद्या (दि. ९) कत्तलची रात्र आहे. सोमवारी रात्री बारा वाजता सवा-यांची मिरवणूक निघणार आहे़

नगरला मोहरमनिमित्त निघणार सवा-यांची मिरवणूक
अहमदनगर: नगर शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमची उद्या (दि. ९) कत्तलची रात्र आहे. सोमवारी रात्री बारा वाजता सवा-यांची मिरवणूक निघणार आहे़
कोठला येथून छोटे इमामे हुसेन यांची तर मंगलगेट हवेली येथून मोठे इमामे हसन यांच्या सवा-यांची मिरवणूक निघेल. कत्तलची रात्रची मिरवणूक मार्ग कोठला मैदान येथून ते फलटण चौकी, बाराइमाम हवेली, मंगलगेट, डाळ मंडई, तेलीखुंट, कापड बाजार, भिंगारवाला चौक, लक्ष्मीबाई कारंजा, सबजेल चौक, पंचपीर चावडी ते रामचंद्र खुंट, कोंड्यामामा चौक ते फलटण चौकी असा आहे़ रात्रभर मिरवणूक झाल्यानंतर सकाळी पुन्हा सवा-यांची स्थापना होते़ त्यानंतर दुपारी विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे़
नगरचा मोहरम राज्यात प्रसिद्ध असून, याला मोठी परंपरा आहे़ मुस्लिमांसह हिंदू बांधवही यात सहभागी होतात़ मोहरमची कत्तलची रात्र व विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे़ मिरवणूक मार्गावर २०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे राहणार आहेत़ मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी मार्गावरील ३६ इमारतींचे छत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ विसर्जन मिरवणुकीला अडथळा येऊ नये, यासाठी कोठला, मंगलगेट परिसरात भरणारा मंगळवारचा बाजार महापालिका प्रशासनाने बंद ठेवला आहे़