अहमदनगर : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी दोन जूनपासून बेमुदत संपावर जात आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी.एस. कांबळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पी.डी. गांडाळ यांना काम बंद आंदोलनाचे निवेदन दिले. डॉक्टरांचे काम बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. राजपत्रित संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन-चार वर्षांमध्ये मॅग्मो संघटनेच्या शासन दरबारी विविध मागण्या आहेत. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीसंदर्भात शासनासोबत अनेकवेळा बैठकाही झाल्या आहेत. परंतु शासनाकडून वैद्यकीय अधिकार्यांची एकही मागणी मंजूर झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नाईलाजास्तव आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड, सरचिटणीस डॉ.प्रमोद रक्षमवार यांनी म्हटले आहे. वैद्यकीय अधिकार्यांना पूर्वलाभ मिळणे, अस्थायी वैद्यकीय अधिकारी गट ब मधील बीएएमएस, बीडीएस यांचे सेवा समावेशन करणे, सेवा ज्येष्ठता यादी तयार करणे, पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी धोरण निश्चित करणे, आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळवून देणे, निवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करणे आदी मागण्या आहेत. मागण्यांसाठी संघटनेने पूर्वीच ३१ मे २०१२ पर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे पुन्हा आंदोलन करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील स्थायी, अस्थायी, कंत्राटी डॉक्टरांनी संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकारी दोन जून पासून संपावर
By admin | Updated: May 30, 2014 01:15 IST