मांस घेऊन जाणारा ट्रक पेटवला
By Admin | Updated: March 20, 2024 16:12 IST2014-09-14T23:04:35+5:302024-03-20T16:12:51+5:30
राहाता (जि. अहमदनगर) : नगर-मनमाड रस्त्यावरून कोपरगावकडे मांस घेऊन जाणारा मालट्रक राहाता येथे तरूणांनी अडवून पेटवून दिला.

मांस घेऊन जाणारा ट्रक पेटवला
राहाता (जि. अहमदनगर) : नगर-मनमाड रस्त्यावरून कोपरगावकडे मांस घेऊन जाणारा मालट्रक राहाता येथे तरूणांनी अडवून पेटवून दिला. तसेच संतप्त जमावाने गाडीवर दगडफेक केली. अर्ध्या तासाने आलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवले.
या बाबत माहिती अशी की, रविवारी दुपारी नगर-मनमाड महामार्गावरून एक ट्रक (जीजे ०९-एव्ही ०४६४) कोपरगावकडे जात असताना राहाता येथे ट्रकमधून मांस गळत असून दुर्गंधी सुटल्याचे काही तरूणांच्या लक्षात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या तरूणांनी ट्रक अडवून चालकाला याबाबत जाब विचारला. हळूहळू लोकांची गर्दी होऊ लागली. जमावाला पाहताच चालक व किन्नर पळून गेले. त्यामुळे काही तरूणांनी गाडीला आग लावली. बघता बघता चारशे-पाचशे लोकांचा जमाव जमा झाला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शिर्डी व राहाता नगरपरिषदेच्या अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले.
संतप्त जमावाने या गाड्यांवरच दगडफेक केल्याने त्यांना आग विझवण्यास काही काळ व्यत्यय आला. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमाव पांगविल्यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी विझवली. यावेळी नगर-मनमाड रस्त्यावर मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (वार्ताहर)