नगराध्यक्षांच्या पतीचा नगरसेवकावर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 17:07 IST2017-03-31T17:07:42+5:302017-03-31T17:07:42+5:30
जामखेड नगरपरिषद नगराध्यक्षांच्या पतींसह इतर सहा जणांनी नगरसेवक गणेश आजबे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला

नगराध्यक्षांच्या पतीचा नगरसेवकावर जीवघेणा हल्ला
जामखेड : जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रिती राळेभात यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी सत्ताधारी गटासह काही विरोधी नगरसेवकांच्या हालचाली सुरु होत्या़ परंतु आवश्यक संख्याबळ न झाल्यामुळे हा अविश्वास ठराव बारगळला़ मात्र यामुळे चिडलेल्या नगराध्यक्षांच्या पतींसह इतर सहा जणांनी नगरसेवक गणेश आजबे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे़ या हल्ल्यात आजबे हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी नगराध्यक्षांच्या पतीसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रिती राळेभात यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी १६ नगरसेवक आठ दिवसांपासून अज्ञातस्थळी गेले होते. यामध्ये सत्ताधारी गटातील नऊजणांचा सहभाग होता़ मात्र अविश्वास ठरावासाठी यातील काही नगरसेवकांचे एकमत झाले नसल्याने अखेर हा अविश्वास ठराव बारगळला़ त्यामुळे यातील काही नगरसेवक पुन्हा जामखेड येथे दाखल झाले. २९ मार्च रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास नगरसेवक गणेश उत्तमराव आजबे (वय ३५, रा. जमादरवाडी, ता. जामखेड) हे शहरातील मेन रोड येथील आजबे वाडा या ठिकाणी होते. यावेळी नगराध्यक्षा प्रिती राळेभात यांचे पती विकास भगवंत राळेभात, प्रशांत जालिंदर राळेभात, पप्पू भगवंत राळेभात, मनोज जालिंदर राळेभात, विकास राळेभात (पूर्ण नाव माहीत नाही) व प्रतिक उर्फ टिल्लू राळेभात (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. जामखेड, असे सहाजण आजबे वाड्यावर आले़ तेथे नगराध्यक्षांचे पती विकास भगवंत राळेभात यांनी नगरसेवक गणेश आजबे यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून आमच्यावर अविश्वास आणतो काय, असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली़ तसेच प्रशांत जालिंदर राळेभात याने लोखंडी रॉडने आजबे यांना मारहाण केली़ तसेच इतर दोघांनी आजबे यांच्यावर तलवार रोखून मारण्याची धमकी दिली़ एकाजणाने आजबे यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची चैन, हातातील पाच ग्रॅमच्या सोन्याच्या आंगठ्या व खिशातील सहा हजार रुपये काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत नगरसेवक गणेश आजबे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या सर्व आरोपी फरार असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी हे करत आहेत.