नागपूर अधिवेशनानंतर महापौर बदल?

By Admin | Updated: December 11, 2014 00:37 IST2014-12-11T00:35:08+5:302014-12-11T00:37:54+5:30

अहमदनगर : महापौर असलेले संग्राम जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडल्याने सुरूवातीच्या काळात सुरू झालेली महापौर बदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Mayor change after Nagpur session? | नागपूर अधिवेशनानंतर महापौर बदल?

नागपूर अधिवेशनानंतर महापौर बदल?

अहमदनगर : महापौर असलेले संग्राम जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडल्याने सुरूवातीच्या काळात सुरू झालेली महापौर बदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महापालिकेत राजकीय खांदेपालट होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. जगताप समर्थकांनी मात्र या बदलाबाबत बोलण्यास नकार दिला असून राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या गोटातून बदलास दुजोरा दिला.
डिसेंबर २०१३ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा मिळवत नगरसेवकांची मोट बांधण्यात यश मिळवत सत्ता स्थापन केली. संग्राम जगताप यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा महापौर पदाची माळ पडली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली.
त्यानंतर लगेचच जगताप राजीनामा देणार, नवीन महापौर शहराला मिळणार याची चर्चा सुरू झाली. पण खुद्द संग्राम जगताप यांनीच असा कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करत ‘घाई करू नका’ असा पक्षश्रेष्ठींचा निरोप असल्याचे समर्थकांना सांगितले. त्यामुळे बदलाची चर्चा थंडावली. आता पुन्हा ही चर्चा जोर धरू लागली आहे. संग्राम जगताप हे महापौर पदाचा राजीनामा देणार असून अभिषेक कळमकर यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत आमदार अरुण जगताप यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मिळाली. त्यांनीही अधिवेशनानंतर पाहू असे म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात अरुण जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. आमदार अरुण जगताप यांची अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे. पण चर्चेचा तपशील समजू शकला नाही, अशी माहिती माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Mayor change after Nagpur session?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.