महापौरांच्या लाचखोर स्वीय सहायकाची कारागृहात रवानगी

By Admin | Updated: May 24, 2016 23:43 IST2016-05-24T23:21:49+5:302016-05-24T23:43:03+5:30

अहमदनगर : महापौर अभिषेक कळमकर यांचा लाचखोर स्वीय सहायक सोहनलाल उर्फ बाबू चोरडिया याला जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Mayor of Bribery Assistant Assistant to Prison | महापौरांच्या लाचखोर स्वीय सहायकाची कारागृहात रवानगी

महापौरांच्या लाचखोर स्वीय सहायकाची कारागृहात रवानगी

अहमदनगर : महापौर अभिषेक कळमकर यांचा लाचखोर स्वीय सहायक सोहनलाल उर्फ बाबू चोरडिया याला जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. चोरडिया याच्यावतीने सादर केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे चोरडिया याची उपकारागृहात रवानगी करण्यात आली.
एका नगरसेविकेच्या मुलाकडून प्रभाग क्रमांक १२ मधील पथदिव्यांचे काम खतवून त्यावर कार्यवाही करण्यासाठी चोरडिया याने नगरसेविकेच्या मुलाकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारली. पथदिव्यांचे काम ७९ हजार रुपयांचे होते. या रकमेच्या पाच टक्केप्रमाणे चोरडिया याने चार हजार रुपयांची मागणी केली होती. नगरसेविकेच्या मुलाने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर एसीबीने सोमवारी महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापतींच्या दालनात सापळा लावून चोरडिया याला रंगेहाथ पकडले. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक इरफान शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर सोमवारी रात्रीच चोरडिया याच्या बुरुडगाव रोडवरील घराची झडती घेतली. मात्र तेथे काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. चोरडिया याने स्वीकारलेली चार हजार रुपयांची रक्कम, ज्या कामासाठी रक्कम स्वीकारली होती, त्या कामाचे सर्व कागदपत्र एसीबीने जप्त केले आहेत. तसेच त्याच कामासाठी पैशांची मागणी करणारे व्हाईस रेकॉर्डिंग जप्त केले आहे. सर्व तपास पूर्ण झाल्याने चोरडिया याला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी एसीबीने मंगळवारी दुपारी न्यायालयात केली. सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी बाजू मांडली. गुन्हा गंभीर असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याची मागणी त्यांनी केली.
आरोपीतर्फे अ‍ॅड. महेश तवले यांनी बाजू मांडली. सर्व तपास पूर्ण झाल्याने आणि आरोपीच्या घरात आक्षेपार्ह असे काहीही आढळून आले नाही, त्यामुळे आरोपीला जामीन मिळण्यासाठीचा अर्ज न्यायालयाकडे सादर केला. सध्या न्यायालयाला सुटी असल्याने आणि सुटीचे कामकाज एकाच न्यायालयात सुरू असल्याने जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे जामीन अर्जावरील सुनावणी आता गुरुवारी होणार आहे. त्यामुळे चोरडिया याची जिल्हा उपकारागृहात रवानगी करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Mayor of Bribery Assistant Assistant to Prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.