मायंबा-मढी देवस्थान आता रोपवेने जोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST2021-07-17T04:18:06+5:302021-07-17T04:18:06+5:30
तीसगाव : राज्यासह देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या नाथभक्तांना सुकर ठरावे यासाठी श्रीक्षेत्र मायंबा व मढी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने ...

मायंबा-मढी देवस्थान आता रोपवेने जोडणार
तीसगाव : राज्यासह देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या नाथभक्तांना सुकर ठरावे यासाठी श्रीक्षेत्र मायंबा व मढी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने रोपवे सुविधेचा संयुक्तिक उपक्रम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. दोन्ही गुरु-शिष्यांची संजीवन समाधीची गर्भगिरीतील ही पौराणिक स्थळे हवाई अंतराने जोडण्यासाठीच्या प्रकल्पाला पंचेचाळीस कोटींचा खर्च येणार आहे. देवस्थानांना रोपवेने जोडण्याचा हा पथदर्शी उपक्रम राज्यातील एकमेव ठरणार आहे.
याबाबत आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने दोन्ही विश्वस्त मंडळांची बैठक रविवारी आष्टी येथे झाली. मायंबा देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड, विधिज्ञ शिवजित डोके यावेळी उपस्थित होते. श्रीक्षेत्र वृद्धेश्वरला नाथसंप्रदायाचे उगमस्थान मानले जाते. जवळच नवनाथांपैकी आद्य मानल्या गेलेल्या मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. तेथून उत्तरेस सात किलोमीटर अंतरावर चैतन्य कानिफनाथांचे संजीवन समाधी असलेले मढी गाव आहे. गर्भगिरी डोंगर, दरी, पठार भागात नाथस्नानाचे सूर्यकुंड, तपश्चर्या, भेटी चर्चा, संवादाची स्थळे आहेत.
सभोवताली वैविध्यपूर्ण अत्यंत दुर्मिळ अशा वनौषधी आहेत. हा सर्व निर्जनस्थळीचा पौराणिक ठेवा हवाई अंतराने भाविकांच्या दृष्टिक्षेपात येणार आहे. या सर्व बाबींवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून तिन्ही देवस्थाने जोडली गेली आहेत. वळणाकार घाटरस्ता, बिबट्यासह जंगली श्वापदांचा वावर अशा समस्या टाळण्याच्या उद्देशाने दोन्ही देवस्थान समित्यांनी हा संयुक्त विकासाचा कृती आराखडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.