मनपा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसूती
By Admin | Updated: September 6, 2016 00:49 IST2016-09-06T00:47:35+5:302016-09-06T00:49:09+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला वेळेवर दाखल करून न घेतल्याने महिलेची रिक्षातून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत येत असतानाच प्रसूती झाली.

मनपा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसूती
अहमदनगर : महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला वेळेवर दाखल करून न घेतल्याने महिलेची रिक्षातून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत येत असतानाच प्रसूती झाली. महिलेचे जन्मलेले अर्भक मृत होते. यामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे.
सारसनगर भागातील प्रीती महेंद्र जोशी (रा. त्रिमूर्ती कॉलनी) या सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रसूतीसाठी कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी त्यांची कोणतीही तपासणी केली नाही. सोनोग्राफी करण्यासाठी त्यांना शहरातील एका खासगी डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला रुग्णालयातील काही डॉक्टरांनी दिला. जोशी या त्यांच्या नातेवाईकांना घेवून सोनोग्राफी करण्यासाठी गेल्या, मात्र तेथे गर्दी आणि गणेशोत्सव यामुळे सोनोग्राफी करण्यासाठी नंबर लागला नाही. यावेळी त्यांना त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा देशपांडे रुग्णालयात रिक्षामधून आणण्यात आले. तेथे त्या रिक्षातून रुग्णालयात येताना प्रवेशद्वारातच प्रसूत झाल्या. महिलेच्या नातेवाईकांनी आरडाओरड करून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना पाचारण केले. परंतु १० ते १५ मिनिटे डॉक्टर तिकडे फिरकलेच नाहीत. काही महिला कर्मचाऱ्यांनी जोशी यांना दाखल करून घेतले. यावेळी जन्मलेले अर्भक मृत असल्याचे आढळून आले. यावेळी जोशी यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)
आमदार संतापले
घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप, नगरसेवक विपुल शेटिया, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबा गाडळकर, प्रकाश भागानगरे, विकी जगताप, गड्डु खताळ, आदी रुग्णालयात दाखल झाले. संबंधित डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आ. जगताप यांनी यावेळी केली. कॉल आॅन डॉक्टर सुविधा असताना महिलेची तपासणी का झाली नाही, असा सवाल आ. जगताप यांनी केला. मात्र डॉक्टरांनी याबाबत मौन बाळगले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच रुग्णालयात दाखल झालो. झालेला प्रकार दुर्दैवी आहे. सदर घटनेची संपूर्ण माहिती घेवून चौकशी केली जाईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
-डॉ. अनिल बोरगे, आरोग्याधिकारी, मनपा