शेवगाव हत्याकांडातील मास्टारमाइंड रमेश भोसले गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 17:53 IST2017-06-30T17:53:14+5:302017-06-30T17:53:14+5:30
जिल्ह्यात खळबळ उडविणाऱ्या हरवणे कुटुंबाचे हत्याकांड भोसले याच्यासह पाच जणांनी केल्याचे समोर आले आहे़

शेवगाव हत्याकांडातील मास्टारमाइंड रमेश भोसले गजाआड
अहमदनगर : शेवगाव येथील चौघांचे हत्याकांड करणारा मुख्य सूत्रधार व कुख्यात गुंड रमेश छगन भोसले (वय २६) याला स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी नेवासा परिसरातून ताब्यात घेतले़ जिल्ह्यात खळबळ उडविणाऱ्या हरवणे कुटुंबाचे हत्याकांड भोसले याच्यासह पाच जणांनी केल्याचे समोर आले आहे़ या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी अद्यापपर्यंत फरार आहेत़
शेवगाव शहरातील विद्यानगर परिसरात राहणारे सेवानिवृत्त सैनिक अप्पासाहेब गोविंद हरवणे व त्यांची पत्नी सुनंदा हरवणे, मुलगा मकरंद हरवणे, मुलगी स्रेहल हरवणे यांची १८ जून रोजी त्यांच्याच घरात निघृर्ण हत्या झाली होती़ घटनेनंतर सातव्या दिवशी पोलिसांनी नेवासा परिसरातून दोन आरोपींना अटक करून या हत्याकांडाचा पदार्फाश केला़ या हत्याकांडातील मुख्य आरोपी रमेश भोसले मात्र फरार होता़ स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना भोसले हा नेवासा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती़ पवार यांच्यासह सहायक निरीक्षक शरद गोर्डे, संदीप पाटील, कॉन्स्टेबल योगेश गोसावी, मन्सूर सय्यद, सुनील चव्हाण, उमेश खेडकर, संदीप पवार, रवी कर्डिले यांच्या पथकाने नेवासा तालुक्यातील नागफणी परिसरात सापळा रचला होता़ पथकाला पाहताच भोसले शेजारच्या शेतात पळून गेला़ पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले़ यावेळी आरोपीकडे गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे मिळून आले़ भोसले याने शेवगाव येथे चौघांचे हत्याकांड केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे़
चार जिल्ह्यांतील पोलीस भोसलेच्या मागावर
रमेश भोसले हा कुख्यात दरोडेखोर असून, त्याने २०१५ मध्ये चाळीसगाव येथे दरोडा टाकून तिघांची हत्या केली होती़ त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज परिसरात गोळी घालून एका व्यक्तीचा खून केला होता़ त्याच्यावर नगरसह चाळीसगाव, जळगाव औरंगाबाद, नाशिक आदी ठिकाणी, चोरी, दरोडा, खून, आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत़ पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते़ शेवगावचे हत्याकांड केल्यापासून भोसले फरार होता़ नेवासा तालुक्यातील बाभूळखेडा परिसरात पोलीस आरोपीस पकडण्यास गेले, तेव्हा याच रमेश भोसले याने पोलिसांवर गावठी पिस्तुलातून गोळीबार करत फरार झाला होता़ पोलीस तपासात भोसले याने केलेले आणखी गुन्हे उघडकीस येणार आहेत़