मसणजोगीला पगार २८ हजार, प्रत्यक्षात मिळतात ६ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:43+5:302021-07-27T04:22:43+5:30
श्रीरामपूर : स्मशानभूमीतील मसणजोगीला नगरपालिकेकडून मिळणाऱ्या पगारावरून सोमवारी पालिकेत राजकारण पेटले. २८ हजार रुपये पगारावरून परस्परविरोधी दावे करणारे मसणजोगीचे ...

मसणजोगीला पगार २८ हजार, प्रत्यक्षात मिळतात ६ हजार
श्रीरामपूर : स्मशानभूमीतील मसणजोगीला नगरपालिकेकडून मिळणाऱ्या पगारावरून सोमवारी पालिकेत राजकारण पेटले. २८ हजार रुपये पगारावरून परस्परविरोधी दावे करणारे मसणजोगीचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे शहरात नव्या चर्चेला तोंड फुटले. मसणजोगी सोनू लक्ष्मण करमंचे याचा अज्ञात व्यक्तीने स्मशानभूमीत व्हिडिओ काढला. त्याला पालिकेकडून २८ हजार रुपये महिना पगार दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात आपल्याला ६ हजार रुपये मिळतात. धनादेश बँकेत वटल्यानंतर पैसे पालिकेत भरतो, असे मसणजोगीने व्हिडिओत म्हटले आहे.
आपण चार वर्षांपासून स्मशानभूमीत काम करतो. दरम्यान, प्रत्यक्षात सहा हजार रुपयेच मिळतात, असा त्याने दावा केला आहे. मात्र, त्याचाच अन्य एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात त्याने चार लोकांनी दमदाटी केली. चुकीची माहिती व्हिडिओत द्यायला भाग पाडले. २८ हजार रुपये पगार हा एकट्याला नाही तर चार जणांना विभागून मिळतो, असा दावा त्याने केला आहे. मात्र, तरीही आकड्यांमधील तफावत कोठेतरी पाणी मुरत असल्याचे सांगत आहे.
मसणजोगीच्या दोन्ही व्हिडिओंवरून पालिकेचे राजकारण चांगलेच पेटले आहे. विरोधकांनी त्यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात भ्रष्टाचार केला जात आहे. २८ हजार रुपये पगारातील खरे लाभार्थी कोण? असा सवाल काँग्रेस नगरसेवक दिलीप नागरे यांनी उपस्थित केला आहे. पालिकेच्या कारभाराचा त्यांनी निषेध नोंदविला. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना लोकमतने संपर्क साधला असता प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.
------
मसणजोगीची पोलिसांत तक्रार
मसणजोगीने शहर पोलिसांत सोमवारी सायंकाळी तक्रार दिली आहे. चुकीचा व्हिडिओ दाखविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे. मुख्याधिकारी यांनाही त्याने निवेदन दिले आहे.