अल्पवयीन मुलीचा विवाह; फिर्याद घेण्यास पोलिसांची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:26 IST2021-08-19T04:26:07+5:302021-08-19T04:26:07+5:30
शेवगाव : मुलीच्या आईने १३ वर्षीय मुलीचे लग्न एका ३० वर्षीय व्यक्तीसोबत लावून दिले असून, याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात ...

अल्पवयीन मुलीचा विवाह; फिर्याद घेण्यास पोलिसांची टाळाटाळ
शेवगाव : मुलीच्या आईने १३ वर्षीय मुलीचे लग्न एका ३० वर्षीय व्यक्तीसोबत लावून दिले असून, याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहे, असे त्या मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे.
मुलीच्या वडिलांनी नगर येथील चाइल्ड लाइनशी संपर्क साधला. त्यांनीही गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार देत घटना आपल्या हद्दीत घडली नाही, झीरो नंबरनेही गुन्हा दाखल करून घेता येणार नाही, असे म्हटले आहे.
बावी, (ता. शिरूर, जि. बीड) येथील एका तेरा वर्षीय मुलीचा तिच्या आईने शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील एका वस्तीवरील तीसवर्षीय व्यक्तीसोबत १८ ऑगस्ट रोजी विवाह निश्चित केला होता. त्या मुलीचे आई-वडील गेल्या काही वर्षांपासून विभक्त झाले आहेत. मुलीचा सांभाळ आई करीत आहे. लहानग्या मुलीचा तिच्या वयापेक्षा दुप्पट वय असलेल्या मुलासमवेत विवाह लावला जाणार असल्याची कुणकुण तिच्या वडिलांना लागली. त्यांनी हा प्रकार नगर येथील चाइल्ड लाइनच्या सदस्यांच्या निदर्शनास आणून दिला. चाइल्ड लाइनचे प्रवीण कदम यांनी याप्रकरणी लक्ष घातले. ही सर्व मंडळी विवाह सोहळा रोखण्यासाठी मुलाकडील कुटुंबीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. मात्र, याची कुणकुण लागताच ठरलेल्या तारखेअगोदरच अज्ञातस्थळी गुपचूप हा नियोजित विवाह लावून देण्यात आला, असे मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यानंतर कदम यांनी शेवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी झीरो नंबरने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. मात्र, त्यांनी नकार दिला, असेही त्यांनी सांगितले.
---
हो ते माझ्याकडे आले होते. मात्र लग्न बीड जिल्ह्याच्या हद्दीत झाले आहे. याची माहिती आम्ही काढली आहे. जिथे लग्न झाले ते ठिकाण फार लांब नाही. त्यामुळे इथे गुन्हा दाखल करता येणार नाही. -प्रभाकर पाटील,
पोलीस निरीक्षक, शेवगाव
----
झीरो नंबरने गुन्हा दाखल करता येतो. त्यांना माझ्याकडे पाठवा व भेटायला सांगा.
-सुदर्शन मुंडे,
पोलीस उपअधीक्षक