बाजार समिती पदाधिकारी बदलाच्या हालचाली
By Admin | Updated: October 13, 2016 00:53 IST2016-10-13T00:12:53+5:302016-10-13T00:53:32+5:30
श्रीरामपूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर बाजार समिती सभापती व उपसभापती बदलाचे वारे जोमाने वाहू लागले आहेत.

बाजार समिती पदाधिकारी बदलाच्या हालचाली
श्रीरामपूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर बाजार समिती सभापती व उपसभापती बदलाचे वारे जोमाने वाहू लागले आहेत. पक्षश्रेष्ठीही या बदलास अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
श्रीरामपूर बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक व पदाधिकारी निवड होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. बाजार समितीचे सत्तारूढ गटाचे सर्वेसर्वा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व आ. भाऊसाहेब कांबळे यांनी समितीच्या अध्यक्षपदी नानासाहेब पवार व उपाध्यक्षपदी सचिन गुजर यांची निवड एका वर्षासाठी केली होती. त्या वेळी ससाणे गटाबरोबर असणारे माजी सभापती दीपकराव पटारे हे स्पर्धेत होते, ‘मला प्रथम संधी द्या, पाहिजे तर सहा महिन्यांनी राजीनामा देईल’ असे त्यांनी सांगूनही नेतेमंडळीत एकमत न झाल्याने पवार व गुजर यांनी संधी देण्यात आली. त्यामुळे पटारे हे नाराज होऊन ससाणे व कांबळे गटापासून दूर होऊन बाजार समितीत विरोधकाची भूमिका बजावत आहेत.
विद्यमान उपाध्यक्ष सचिन गुजर हे या सभापतिपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे याबाबत बदलाचा आग्रह धरला असल्याचे समजते. गुजर हे बाजार समितीच्या निवडीनंतर अध्यक्षपद न दिल्यामुळे व मुळा-प्रवरा वीज सोसायटी संचालक मंडळ निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे नाराज होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका जाहीर होण्यापूर्वी श्रीरामपूर बाजार समितीचे पदाधिकारी बदलून नव्याने निवडावेत, अशी मागणी व चर्चा जोर धरू लागली आहे. परंतु श्रेष्ठी व नेत्यांनी निवडणुकीपर्यंत थांबावे लागेल, असा निर्णय घेतल्याचे समजते. अध्यक्षपदासाठी सचिन गुजर, सुधीर नवले, तर उपाध्यक्षपदासाठी राधाकृष्ण आहेर, विश्वनाथ मुठे, सोन्याबापू शिंदे, नितीन आसने आदींच्या नावाची चर्चा आहे. (वार्ताहर)