अहमदनगर: जकात बंद केल्यानंतर मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार लावून ही रक्कम महापालिकेला देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार नगर महापालिकेला शासनाकडून १ कोटी ३३ लाख रुपये मिळणार आहेत. राज्यातील महापालिकांना ही रक्कम तत्काळ अदा करावी असे आदेश नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शासनाकडून हे पैसे येत्या दोन-चार दिवसात मिळणार असल्याने नगर महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. जकात बंद झाल्यानंतर महापालिकेचा आर्थिक स्त्रोत कमी झाला. त्यामुळे मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार लावून ही रक्कम महापालिकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यापूर्वी याच शुल्कातून नगर महापालिकेला शासनाने ३ कोटी ७४ लाख रुपये दिलेले आहेत. मार्च २०१४ अखेरपर्यंतचे १ कोटी ३३ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ देण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ठेकेदारांनी देयके देण्यासाठी आयुक्तांच्या दालनात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. शासनाकडून निधी मिळताच देयके अदा करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. शासन आदेशानुसार महापालिकेला दोन-चार दिवसात ही रक्कम मिळणार असल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. जकातीनंतर आता पारगमन शुल्क वसुलीही बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महापालिकेला पारगमन शुल्कातून मिळणारे उत्पन्नही बंद होणार आहे.कर्मचाऱ्यांच्या पगाराची चिंता असलेल्या महापालिकेला या निधीमुळे दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)डिसेंबरपर्यंत मालमत्ता सर्वेक्षण पारगमन शुल्क वसुली बंद झाल्याने पालिकेला दरमहा पावणेदोन कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी मालमत्ता कर वसुली वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण उपग्रहाद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. खासगी कंपनीमार्फत हा सर्व्हे केला जाणार असून डिसेंबर अखेरपर्यंत तो पूर्ण करून देण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.
मुद्रांक शुल्क रकमेने मनपाला दिलासा
By admin | Updated: July 24, 2014 00:17 IST