आतेभावांनीच केले मामाच्या मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 17:52 IST2017-09-13T17:44:42+5:302017-09-13T17:52:24+5:30
मुलीला कारमध्ये टाकून भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने जात असताना हंगेवाडीतील तरुणांनी ही कार अडवून मुलीची सुटका केली. संबंधीत मुलीला पळविणा-या तिघांना हंगेवाडीतील तरुणांनी बेदम मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले.

आतेभावांनीच केले मामाच्या मुलीचे अपहरण
श्रीगोंदा : दोघा तरुणांनी चक्क आपल्याच मामाच्या मुलीचे अपहरण करण्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या मुलीला कारमध्ये टाकून भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने जात असताना हंगेवाडीतील तरुणांनी ही कार अडवून मुलीची सुटका केली. संबंधीत मुलीला पळविणा-या तिघांना हंगेवाडीतील तरुणांनी बेदम मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले.
श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील एक महाविद्यालयीन तरुणी श्रीगोंदा येथे रोज बसने शिक्षणासाठी येत होती. बुधवारी ती कॉलेज संपल्यानंतर देशमुखवस्ती बस स्थानकावर उतरुन एका तरुणाबरोबर घरी जात होती. त्याचवेळी पाठीमागून एक कार आली अन् त्यांच्याजवळ येऊन थांबली. या कारमधून या मुलीचा सिद्धटेक येथील एक व घुगलवडगाव येथील एक असे दोन आतेभाऊ व तिसरा अनोळखी तरुण उतरले. त्यांनी संबंधित मुलीला त्यांच्यासोबत येण्याचा आग्रह केला. त्यास मुलीने विरोध केला असता त्यांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसविले. यावेळी तिच्यासोबत असणा-या मुलांने या तिघांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांनीही त्याला चोप देत मुलीला कारमध्ये टाकून पळवून नेले. संबंधित मुलीला घेऊन तिघेही भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने चालले होते. त्यावेळी चिंभळे येथील युवकांनी ही कार अडविण्याचा प्रयत्न केला. पण कार भरधाव वेगाने पुढे निघून गेली. त्यांनी तात्काळ हंगेवाडीतील तरुणांना फोनवरुन घटनेची माहिती देत कार अडविण्यास सांगितले. भरधाव वेगाने येणारी कार पाहून हंगेवाडीच्या तरुणांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून कार अडविली. या कारमधील तिघांना पकडून बेदम चोप दिला. कार पलटी करुन तिच्या काचा फोडल्या. त्याचवेळी काही तरुणांनी पोलिसांना फोनवरुन घटनेची माहिती दिली. दरम्यान कारचालक या तरुणांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला असून, या तरुणीचे नातेवाईक असलेले घुगलवडगाव व सिद्धटेक येथील दोघा तरुणांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तेथे दोघांनाही समज देऊन सोडून देण्यात आले. ही घटना नात्यातीलच असल्यामुळे पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मुलीला पळविणारा तिचा घुगलवडगाव येथील आतेभाऊ दहावीला तर सिद्धटेक येथील आतेभाऊ शाळा सोडून शेती करीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.