अमृतच्या ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांना मलिदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:14+5:302021-06-26T04:16:14+5:30
अहमदनगर : शहरात हाती घेण्यात आलेल्या अमृत भुयारी गटार योजनेच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच घमासान झाले. ठेकेदार महापालिकेचा ...

अमृतच्या ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांना मलिदा
अहमदनगर : शहरात हाती घेण्यात आलेल्या अमृत भुयारी गटार योजनेच्या कामावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच घमासान झाले. ठेकेदार महापालिकेचा जवाई आहे का, असा सवाल उपस्थित करत ठेकेदाराकडून मलिदा मिळत असल्याने अधिकारी त्याला पाठीशी घालत आहेत, असा गंभीर आरोप सदस्यांनी सभागृहात केला.
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महापालिकेत सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरुवातीला अमृत भुयारी गटार योजनेचा विषय चर्चेला आला. योजनेच्या कामावरून सदस्य चांगलेच अक्रमक झाले. राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी अमृत योजनेचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला खडेबोल सुनावले. भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराने अक्षरश: रस्त्याची चाळण केली आहे. रस्त्यात खोदलेल्या खड्डयांत पडून अनेकजण गंभर जखमी झाले. दोन दिवसांपूर्वी एक महिला छोट्या मुलासह खड्डयात पडली. ठेकेदारावर कारवाई न करता पाठीशी घातले जात आहे, असा आरोप भागानगरे यांनी केला.
महापौर वाकळे यांनीही अक्रमक पवित्रा घेत ठेकेदाराचा भंडाफोड केला. अमृत योजनेचे काम घेतलेला ठेकेदार स्वत: कधीच बैठकीला आला नाही. बिल मात्र न चुकता घेऊन जातो. अधिकारीही अशा ठेकेदाराचे बिल काढून देतात, ही बाब गंभीर आहे. जेवढा ठेकेदार जबाबदार आहे, तेवढेच अधिकारीही जबाबदार आहेत. अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असा आदेश महापौर वाकळे यांनी दिला. त्यावर ही वस्तुस्थिती आहे. ठेकेदाराला कदापि पाठीशी घालणार नाही. वेळेत काम पूर्ण केले नाही, तर ठेकेदाराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आयुक्त शंकर गोरे यांनी महापौरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सभापती अविनाश घुले यांनीही अमृतच्या योजनेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. उपमहापौर मालन ढोणे यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. त्यावर ठेकेदारासोबत सायंकाळी बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे महापौर वाकळे यांनी जाहीर केले. सागर बोरुडे यांनी महापालिकेला हरित लवादाने केलेली ४० लाखांच्या दंडाची रक्कम अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून वसूल करावी, अशी मागणी केली. याप्रकरणी अधिकारी जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा, असा आदेश महापौर वाकळे यांनी दिला. यावेळी सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनी महापौरांच्या कार्यकाळातील कामांची माहिती देत प्रशासनाचे आभार मानले.
........
विद्युत दिव्यांवरून सभा तापली
गतवर्षी सर्व नगरसेवकांना इलेक्ट्रिक कामासाठी प्रत्येकी एक लाखाचा निधी दिला होता. मात्र, ठरावीक नगरसेवकांनाच विद्युत दिवे दिले. काहींना काहीच मिळाले नाही. असे का, असा प्रश्न सेनेचे नगरसेवक दत्ता कावरे यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना विद्युत विभागप्रमुख आर. जी. मेहेत्रे यांनी उत्तर देताना सांगितले की, सर्व प्रभागांत दिवे बसविले आहेत. यावरून कावरे चांगले संतापले. या लाईट आमच्या घरी बसवित नाही, अशा शब्दात अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. त्यावर विद्युत विभागप्रमुख यांनी हे दिवे मी माझ्या घरी नेले नाहीत, असे सभागृहाला सांगितले. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी त्यात हस्तक्षेप करत मेहत्रे यांना तंबी दिली व पुढील काळात हा प्रश्न राहणार नाही, असे सांगितले.
....
प्रेमदान चौकात ठरली महापौर पदाची रणनीती
गतवेळी महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडे बहुमत नव्हते. भाजपाचा महापौर करण्याचे ठरले. आपण स्वत: बाबासाहेब वाकळे यांच्याशी प्रेमदान चौकात चर्चा केली. त्यांनी महापौर हाेण्याची तयारी दर्शविली. अशा पद्धतीने प्रेमदान चौकात बाबासाहेब वाकळे यांच्या महापौर पदाची रणनीती आखली गेल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले यांनी सभागृहात केला.
....
सदस्यांच्या कौतुकाने वाकळे भारावले
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या कार्यकाळातील शुक्रवारी शेवटची सभा होती. या सभेत सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी महापौर वाकळे यांचे तोंडभरून कौतुक केले. काहींनी आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या. सदस्यांकडून होत असलेल्या कौतुकाने वाकळेही भारावून गेले.