‘मेक वे ४२०’ कोठडीत
By Admin | Updated: December 16, 2015 23:08 IST2015-12-16T22:34:11+5:302015-12-16T23:08:03+5:30
अहमदनगर :सहली रद्द करून फसवणूक करणाऱ्या ‘मेक वे हॉलिडे’ या पर्यटन कंपनीचा मालक विजयभान रामेश्वर सिंग (रा. पुणे) याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती.

‘मेक वे ४२०’ कोठडीत
अहमदनगर : पर्यटक आणि इतर ट्रॅव्हल्स कंपनीचे ४८ लाख रुपये घेवून सहली रद्द करून फसवणूक करणाऱ्या ‘मेक वे हॉलिडे’ या पर्यटन कंपनीचा मालक विजयभान रामेश्वर सिंग (रा. पुणे) याला कोतवाली पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. त्याला बुधवारी न्यायालयाने चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई येथील ‘मेक वे हॉलिडे’ या कंपनीने पर्यटक आणि ड्रीम हॉलिडे या कंपनीकडून ४८ लाख रुपये जमा करून घेतले. त्यानंतर अचानक सहली रद्द केल्या. त्यामुळे पर्यटकांची फसवणूक झाली. या प्रकरणी नगर येथील आनंद टूर्स कंपनीच्या सरिता साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात झेनी विजयभान सिंग उर्फ सोनाली डिसिल्व्हा वसदर आणि विजयभान रामेश्वर सिंग (रा. पुणे) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे-मुंबई येथे पथक पाठवून आरोपीला जेरबंद केले. त्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता त्याने पर्यटक व ट्रॅव्हल्स कंपनीचे पैसे घेतल्याची कबुली दिली. सिंग याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. तोडकर यांनी सिंग याला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
(प्रतिनिधी)
ड्रीम हॉलिडेजच्या गुन्ह्यात समावेश तीन-चार महिन्यांपूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात काही पर्यटकांनी दिलेल्या फिर्यादीवरून ड्रीम हॉलिडेज या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातही सिंग याचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्याचाही तपास सुरू असून सिंग याने आणखी कोणाची फसवणूक केली, पर्यटकांचे किती पैसे घेतले, कोणकोणत्या सहलींचे नियोजन रद्द झाले होते, याचा तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी तथा कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी सांगितले.