कोपरगाव : स्पर्धा परीक्षा या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या क्षमता, प्रयत्न व सातत्य यांची कसोटी पाहतात. म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना गोंधळून न जाता प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण रुपाली भगत यांनी सांगितले.
कोपरगाव शहरातील सोमैया महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग, अंतर्गत गुणवत्ता कक्ष व पिरॅमिड ॲकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पी. एस. आय., एस. टी. आय., असिस्टंट पूर्व परीक्षांची तयारी या विषयावर शुक्रवारी (दि. २९) एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आले. या वेबिनारमध्ये रुपाली भगत यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन सत्रामध्ये महाविद्यालयातील व परिसरातील एकूण १९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ७६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पिरॅमिड ॲकॅडमीचे अध्यक्ष विकास मालकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष पगारे उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. वासुदेव साळुंके यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रवींद्र जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. विजय ठाणगे, कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे, ग्रंथपाल नीता शिंदे, प्रा. आकाश सोनवणे यांनी प्रयत्न केले.