यंदाच्या वर्षी मका खाणार भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:13+5:302021-09-10T04:27:13+5:30
टाकळीभान : मकाच्या पिकाला यंदा उच्चाकी भाव मिळण्याची शक्यता आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मका लागवडीखालील क्षेत्र या वर्षी कमी झालेले ...

यंदाच्या वर्षी मका खाणार भाव
टाकळीभान : मकाच्या पिकाला यंदा उच्चाकी भाव मिळण्याची शक्यता आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मका लागवडीखालील क्षेत्र या वर्षी कमी झालेले असतानाच जनावरांच्या मुरघासाची कुट्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मका तोडली जात आहे. बाजारपेठेत मकाला सध्या २ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. हा दर मकाच्या हमीभावपेक्षा अधिक आहे.
ऑक्टोबरपासून खरीप मक्याची आवक सुरू होते. १५ ऑक्टोबरनंतर रब्बी मक्याची पेरणीही सुरू होते. या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला झुकते माप दिलेले आहे. अनेक ठिकाणी उसाची लागवडही विक्रमी झालेली आहे. त्यामुळे खरीप मक्याचे उत्पादन कमी होणार आहे. परिणामी ऑक्टोबर २०२१ ते सप्टेबर २०२२ या मार्केटिंग वर्षात मक्याला चांगला दर अपेक्षित आहे. सध्याच मका पिकाला २००० ते २१०० रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळत आहे. त्या अनुषंगाने या वर्षी शेतकऱ्यांनी रब्बीत मक्याखालील क्षेत्र वाढविणे फायदेशीर ठरणार आहे. तालुक्यातील गोदावरी नदी लगतच्या सर्वच गावात तसेच वैजापूर, गंगापूर, नेवासा, येवला, कोपरगाव तालुक्यातही मका मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. अलीकडच्या काळात दुधाळ जनावरांसाठी मकापासून मुरघास तयार करण्याला जास्त पसंती दिली जात आहे. त्यामुळे अडीच महिन्यातच अनेक शेतकरी मका मूरघासाला विकून टाकतात.
विकत घेणारा स्वतः मका तोडून तिची कुट्टी करून घेऊन जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना सोंगणीचा खर्चही येत नाही. तसेच त्यातून एकरी ३५ ते ४० हजार रुपयेही शेतकऱ्यांना मिळतात. शिवाय रानही झटपट पुढील पिकाला मोकळे होते. त्यामुळे मकाचे सोंगणी करून दाणे करण्याचे प्रमाण दिवसागणिक कमी होत चालले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बाजार समित्यांमध्ये २०१७ पर्यंत दररोज ५ हजार ते ७ हजार क्विंटलपर्यंत मकाची आवक असायची. आता ही आवक ५०० ते १००० क्विंटलपर्यंत कमी होत गेली. त्यामुळे यंदा मकाचे बाजारभाव तेजीत राहणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.
..................
श्रीरामपूर तालुक्यातील मका लागवडीखालील क्षेत्र
श्रीरामपूर मंडल-११७७ हेक्टर
उंदीरगाव मंडल- ५९९ हेक्टर
टाकळीभान मंडळ- ११८४ हेक्टर
बेलापूर मंडळ -१०१६ हेक्टर
एकूण-३९७६ हेक्टर
.....................
मकाचा किमान हमीभाव १८७०
सध्याचा दर २०००
.......................
यंदा मकाचे बाजारभाव तेजीतच राहतील. मुरघासाठी मका जास्त प्रमाणात तुटत आहे. त्यातून १८०० रुपये टनाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. एकरी १६ ते १८ टनातून शेतकऱ्यांना साधारणतः ४०-४५ हजार रुपये झटपट मिळत असल्याने शेतकरी त्यास पसंती देत आहेत.
- नीलेश पापडीवाल, व्यापारी, टाकळीभान
..............
यावर्षी अडीच एकर मका होती. यापैकी २ एकर मका मुरघासासाठी ९०० रुपये प्रती गुंठाप्रमाणे विकून टाकली. ७२ हजारांचे उत्पन्न मिळाले.
- गणेश ठाणगे, शेतकरी, खैरी