मोलकरीण कामगारांनी घासली भांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:07+5:302021-06-29T04:15:07+5:30
अहमदनगर : राज्य सरकारने जाहीर केलेले दीड हजार रुपयांचे अनुदान घरेलू कामगारांना तातडीने मिळावे, त्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तत्काळ ...

मोलकरीण कामगारांनी घासली भांडी
अहमदनगर : राज्य सरकारने जाहीर केलेले दीड हजार रुपयांचे अनुदान घरेलू कामगारांना तातडीने मिळावे, त्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगार महिलांनी कार्यालयासमोरच भांडी घासून सरकारचा निषेध केला.
या आंदोलनात संघटेनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, प्रमिला रोकडे, उषा बोरुडे, रेखा पाटेकर, अग्नीश अल्हाट, सुनंदा भिंगारदिवे, विमल मिरपगार, वंदना भिंगारदिवे, राजश्री बनकर, सविता बनकर, लता बनकर, आदी घरेलू मोलकरीण कामगार सहभागी झाल्या होत्या.
अहमदनगर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील चार ते साडेचार हजार घरेलू कामगारांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी केलेली आहे. राज्य सरकारने ३० एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार पात्र असलेल्या घरेलू कामगारांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. टाळेबंदीनंतर सध्याची परिस्थिती पाहता घरेलू कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. त्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मदतीची तातडीने गरज आहे. मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले होते. मात्र, घरेलू कामगार महिला या अशिक्षित व आर्थिक दुर्बल घटक असल्याने त्यांना कामावर सुट्टी टाकून सायबर कॅफेमध्ये जाणे कठीण आहे. तसेच ऑनलाईन अर्ज भरणे अशक्य आहे.
सर्व माहितीची कार्यालयानेच पूर्तता करावी. त्यामुळे घरेलू कामगारांचा वेळ व पैसा वाचणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
---
फोटो- २८ कामगार
राज्य सरकारने जाहीर केलेले दीड हजार रुपयांचे अनुदान घरेलू कामगारांना तातडीने मिळावे या मागणीसाठी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भांडी घासून आंदोलन करण्यात आले.