अकोले तालुक्यात ७५ गावांत महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:15+5:302021-02-05T06:35:15+5:30
अकोले : तालुक्यातील १४६ ग्रामपंचायतींचे २०२० ते २०२५ या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, ७५ ग्रामपंचायतींवर महिलाराज ...

अकोले तालुक्यात ७५ गावांत महिलाराज
अकोले : तालुक्यातील १४६ ग्रामपंचायतींचे २०२० ते २०२५ या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, ७५ ग्रामपंचायतींवर महिलाराज असणार आहे, तर अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील १०० ग्रामपंचायतीत अनुसूचित जमाती प्रवर्गातील स्त्री- पुरुष आरक्षण आहे. १४६ पैकी केवळ २१ गावे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून, यात ११ गावांत महिला सरपंच निश्चित असणार आहेत. म्हणजे सर्वसाधारणमध्ये केवळ १० ठिकाणी पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे.
अंबड, लिंगदेव, गणोरे, देवठाण, रुंभोडी, नवलेवाडी, धामणगाव आवारी, सुगाव खुर्द, लहीत खुर्द व बुद्रुक अशा मोठ्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांचा समावेश असल्याने येथे सरपंचपदासाठी रस्सीखेच ठरलेली आहे. बिगर पेसा क्षेत्रातील नऊ ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने तालुक्यात १४९ पैकी १०९ ग्रामपंचायतीत आदिवासी समाजातीलच सरपंच असणार आहे. मात्र, बिगर पेसामधील इंदोरी, औरंगपूर, वाशेरे, परखतपूर, आदी गावांत आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील सदस्यच नसल्याने सरपंचपद रिक्त राहणार आहे. पिंपळगाव खांड, उंचखडक खुर्द, कळस बुद्रुक, तांभोळ ही चार गावे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. १२ गावे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहेत. यात विरगाव, कळस खुर्द, डोंगरगाव, धुमाळवाडी, गर्दणी, मेहेंदुरी, उंचखडक बुद्रुक, मन्याळे, बोरी, सुगाव बुद्रुक, बहिरवाडी, ढोकरी या गावांचा समावेश आहे. तालुक्यातील म्हाळादेवी, निंब्रळ, निळवंडे, कोतुळ, अंभोळ, धामणगाव पाट, पाडाळणे, विठे, टाहाकारी, जामगाव, शेलद, पिंपळगाव नाकविंदा, शेरणखेल, चितळवेढे येथे सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांची बऱ्यापैकी कुटुंब आहेत. पण, ही गावे पेसा क्षेत्रात येत असल्याने अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण आहे.