महावितरणला सहवीजनिर्मितीचा हात‘भार’
By Admin | Updated: May 22, 2014 00:04 IST2014-05-21T23:58:16+5:302014-05-22T00:04:03+5:30
चंद्रकांत शेळके, अहमदनगर मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ घालताना मेटाकुटीला आलेल्या महावितरणला साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांनी चांगलाच हातभार लावला आहे.
महावितरणला सहवीजनिर्मितीचा हात‘भार’
चंद्रकांत शेळके, अहमदनगर मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ घालताना मेटाकुटीला आलेल्या महावितरणला साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांनी चांगलाच हातभार लावला आहे. नगर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात सात साखर कारखान्यांनी एकूण १६ कोटी ८८ लाख ५३ हजार १४५ युनिट विजेची विक्री महावितरणला केली. त्यातून कारखान्यांना सुमारे ९८ कोटींचा फायदा झाला आहे. दिवसेंदिवस विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे मात्र अपुर्या वीजनिर्मिती प्रकल्पांमुळे विजेचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे प्रसंगी बाहेरील राज्यांमधून जादा दराने वीज खरेदी करण्याची वेळ महावितरणवर येते. त्याचा अप्रत्यक्षरित्या भार शेवटी ग्राहकांवरच पडतो. अशा परिस्थितीत मात्र राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे सहवीजनिर्मिती प्रकल्प महावितरणसाठी वरदानच ठरत आहेत. वर्षातून सात-आठ महिन्यांच्या गाळप हंगामात तयार झालेली ही वीज कारखाने स्वत:ची गरज भागवून उरलेली महावितरणला विक्री करतात. सध्या विक्रीचा दर ५ रूपये ८१ पैसे युनिट आहे. जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांपैकी १० कारखान्यांकडे सहवीजनिर्मिती प्रकल्प आहेत. त्यातील दैवदैठण (ता. श्रीगोंदा) येथील साईकृपा शुगर व जामखेड येथील जय श्रीराम हे दोन कारखाने वीज विक्री करीत नाहीत. तसेच यंदा हिरडगावचा साईकृपा कारखाना बंदच होता. त्यामुळे उरलेल्या सात कारखान्यांनी यंदाचा हंगाम सुरू झाला तेव्हापासून (आॅक्टोबर २०१३ ते मे २०१४) सुमारे १६ कोटी ८८ लाख ५३ हजार १४५ युनिट विजेची विक्री महावितरणला केली. जलविद्युत प्रकल्पही मदतीला साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांबरोबरच जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पही महावितरणला वीज विक्री करतात. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणावर १२, तसेच कोदणीचा ३४ मेगावॅटचा प्रकल्प आहे. आता आणखी सात मेगावॅटचा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. म्हणजे भविष्यात एकूण ५३ मेगावॅट वीज महावितरणला मिळेल. गेल्या आठ वर्षांपासून मुळा साखर कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू आहे. १६ मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प असून, यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात भर पडते. मागच्या दोन वर्षांपासून पावसाने ताण दिल्याने गाळप जरा कमीच आहे. तरीही यंदा कारखान्याने सुमारे ४ कोटींची वीजनिर्मिती करून २ कोटी १० लाख युनिट महावितरणला विक्री केली. पुढील वर्षी यापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट आहे. - शंकरराव गडाख, आमदार व संचालक मुळा कारखाना अशोक कारखान्याने यंदापासूनच सहवीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला आहे. १५ मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पातून पहिल्याच प्रयत्नात ५ कोटी ३१ लाख युनिट वीजनिर्मिती करून त्यातील सुमारे साडेतीन कोटी युनिट महावितरणला विकले. राज्यात अनेकांचे प्रकल्प बंद पडत असताना आम्ही मात्र पहिल्याच प्रयत्नात मुसंडी मारली आहे. पुढील वर्षी हंगाम लवकर सुरू गेला जाईल. - सुरेश गलांडे, अध्यक्ष अशोक कारखाना