विसापूर : देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथे एका स्वयंघोषित महाराजाने ५३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून, आरोपीवर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संतोष नारायण बनकर (वय ३७) असे या महाराजाचे नाव आहे़गुरुवारी (दि. ७) सायंकाळी पीडित महिला घरात एकटी होती़ ते पाहून स्वयंघोषीत महाराज म्हणून मिरवणा-या संतोष नारायण बनकर याने संबंधित महिलेच्या घरात घुसून ‘तू मला आवडतेस, मला तुझ्यावर प्रेम करु दे’, असे म्हणत तिच्या अंगास लगट करु लागला़ त्यामुळे पीडित महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ही आरडाओरड ऐकून शेतात गेलेली त्या महिलेची सून पळत घराकडे आली़ पळत येणा-या सुनेला पाहून बनकर याने तेथून पळ काढला.आरोपीसोबत झालेल्या झटापटीत पीडितेच्या हातातील बांगड्या फुटल्याने हाताला जखमा झाल्या आहेत. याबाबत बेलवंडी पोलिसांनी आरोपी संतोष नारायण बनकर याच्याविरुद्ध कलम ३५४ व ४५२ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक ललीत पांडुळे करत आहेत.
देवदैठण येथे महाराजाने केला महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 11:11 IST