मनपाच्या कॅफोंना धक्काबुक्की, दमबाजी
By Admin | Updated: May 24, 2016 23:38 IST2016-05-24T23:35:47+5:302016-05-24T23:38:27+5:30
अहमदनगर: महापालिकेचे मुख्यलेखाधिकारी (कॅफो) हितेश विसपुते यांना मुकुंदनगरमधील ठेकेदारांनी त्यांच्या दालनात घुसून धक्काबुक्की करत दमबाजी केली.

मनपाच्या कॅफोंना धक्काबुक्की, दमबाजी
अहमदनगर: महापालिकेचे मुख्यलेखाधिकारी (कॅफो) हितेश विसपुते यांना मुकुंदनगरमधील ठेकेदारांनी त्यांच्या दालनात घुसून धक्काबुक्की करत दमबाजी केली. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी मध्यस्थी करत कॅफोची सुटका केली.
महापालिकेची आर्थिकस्थिती बिकट असल्याने ठेकेदारांची देणी ६० कोटी रुपयांवर पोहचली आहेत. ठेकेदारांची प्रतीक्षा यादी तयार करून त्यानुसार बिले अदा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र काही ठेकेदारांना ते मान्य नाही. प्रतीक्षा यादी व्यतिरिक्तही बिले दिली जातात असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळेच महापालिकेच्या मुख्य लेखाधिकारी दालनात ठेकेदारांचा कायम राबता असतो. त्यातून रोज शाब्दिक चकमक होत आहे. गत महिन्यात लेखनिक लोंढे यांनाही मारहाण झाल्याची घटना घडली होती. मुकुंदनगरमधील नगरसेवकाचे नातेवाईक व काही ठेकेदारांनी मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या दालनात घुसखोरी केली. आमचे बिल द्या, त्याशिवाय बाहेर जाऊ देणार नाही. बाहेर येऊन तर बघा, दाखवतो अशी दमबाजीची भाषा वापरत धक्काबुक्की केली. हा प्रकार सुरू असतानाच उपायुक्त चारठाणकर तेथे पोहचले. त्यांनी मध्यस्थी करत विसपुते यांनी सुटका केली. तसेच ठेकेदारांना महापालिकेच्या बाहेर काढले.
गत महिन्यात चारठाणकर यांनी कॅफोंना बिल काढण्यासंदर्भात नियमावली घालून दिली आहे. त्यानुसार काम करावे अशी सूचना त्यांनी दिली. मात्र त्यानुसार बिल वाटप होत नसल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. त्यातूनच धक्काबुक्कीचा हा प्रकार घडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
(प्रतिनिधी)