बहुरूपी भक्तांना परमेश्वर भेटत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST2021-03-15T04:20:36+5:302021-03-15T04:20:36+5:30
जवळे : परमेश्वराचे सगुण रूप पाहायचे असेल तर भक्ताने परमेश्वराशी एकरूप होणे गरजेचे आहे. जे भक्त केवळ कपाळी केशरी ...

बहुरूपी भक्तांना परमेश्वर भेटत नाही
जवळे : परमेश्वराचे सगुण रूप पाहायचे असेल तर भक्ताने परमेश्वराशी एकरूप होणे गरजेचे आहे. जे भक्त केवळ कपाळी केशरी गंध, सर्वांगावर भस्म लावतात, अशा बहुरूपी भक्ताला परमेश्वर कधीच भेटू शकत नाही, असे निरूपण डॉ. विकासानंद महाराज यांनी केले.
पिंपळनेर (ता.पारनेर) येथील संत निळोबाराय महाराज समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. योळी त्यांनी संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगाचे निरूपण केले. परमेश्वराचे रूप सगुण असून, ते पृथ्वीतलावर सर्वत्र पाहावयास मिळते. सद्गुरूनिष्ठ श्री निळोबाराय महाराजांनी आपल्या भक्तीतून परमेश्वरालाही प्राप्त केले. गुरू तुकाराम महाराजांनाही भेटीसाठी शेवटच्या क्षणी वैकुंठात यावे लागले. अशी अपार भक्ती करावे लागते, तेव्हा परमेश्वर भेटतो, असे त्यांनी सांगितले.
निळोबाराय महाराज समाधी सोहळ्यानिमित्त प्रथम टाळाचा मान जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या देहूकर महाराज यांचा असतो. त्याप्रमाणे १४ मार्चला तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे, रामदास महाराज मोरे, पंढरीनाथ महाराज मोरे यांच्या हस्ते समाधीची महापूजा करण्यात आली. यावेळी निळोबाराय देवस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते.
सोमवारी (दि.१५) हैबतबाबा फडकरी आळंदी संस्थानचे अध्यक्ष ढेरे नरहरी बाबा व संस्थानच्या संचालकांमार्फत मानाच्या दुसऱ्या टाळाची महापूजा व सकाळी आठ ते दहा कीर्तन सोहळा होणार आहे. मंगळवारी (दि.१६) सकाळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. ज्ञानेश्वर माउली कदम (आळंदी) यांचे सकाळी आठ ते दहा कीर्तन, दुपारी १२ ते २ पांडुरंग महाराज घुले यांचे काल्याचे कीर्तन होऊन समाधी सोहळ्याची सांगता होणार आहे.
---
१४ विकासानंद