लॅबचालकांकडून लूटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 01:00 IST2016-10-16T00:33:22+5:302016-10-16T01:00:36+5:30

बेलापूर : श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या गावांत साथीच्या आजाराने थैमान घातले असून, डेंग्यूच्या धास्तीने तपासणीकरिता अनेकांनी खासगी लॅबची वाट धरली आहे.

Looters from labbers | लॅबचालकांकडून लूटमार

लॅबचालकांकडून लूटमार


बेलापूर : श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या गावांत साथीच्या आजाराने थैमान घातले असून, डेंग्यूच्या धास्तीने तपासणीकरिता अनेकांनी खासगी लॅबची वाट धरली आहे. डेंग्यू तपासणीसाठी सहाशे रुपये इतकी फी शासनाने निर्धारित करून दिली असली, तरी शासनाचा हा आदेश टोपलीबंद करून खासगी लॅबचालकांकडून रुग्णांची लुटमार सुरू आहे. या टेस्टसाठी रुग्णांकडून सरसकट हजार रुपये घेतले जात असल्याचे वास्तव एका रुग्णाने ‘लोकमत’कडे मांडले.
बेलापूर परिसरातील उक्कलगाव, गळनिंब, एकलहरे परिसरात साथीच्या आजाराने लोक हैराण झाले आहेत. बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्दी, खोकला, ताप, सांधेदुखीचे रोज जवळपास शंभर रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. या रुग्णांना डेंग्यूची भीती असल्याने ते स्वत:च रक्त तपासणी करत आहेत. रक्त तपासणीकरिता शासकीय लॅब जिल्ह्यात उपलब्ध नाही, त्यामुळे खासगी लॅबशिवाय रुग्णांनाही पर्याय नाही. नेमके हीच संधी साधून खासगी लॅबवाले रुग्णांकडून सर्रास एक हजार व त्यापेक्षा अधिक रुपये उकळत आहेत. वास्तविक डेंग्यूची टेस्ट करण्याकरिता रुग्णांकडून सहाशे रुपये आकारावेत असे आदेश शासनाने गत आठवड्यातच काढले. मात्र अनेक लॅबचालकांपर्यंत हे आदेश पोहचलेले नाहीत. रुग्णांनाही असा आदेश निघाल्याचे माहिती नाही. शासनाने त्याची जनजागृती न केल्याने लॅबचालकांकडून ही लूटमार सुरू आहे.
उक्कलगाव येथील एका नागरिकाने लॅबचालकाने हजार रुपयांची मागणी केल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली. मात्र या रुग्णाने सहाशे रुपयांचा आदेश असल्याचे निदर्शनास येताच लॅबचालकाने असा आदेश पोहचला नसल्याचे प्रथम सांगितले. नंतर मात्र त्याने मुकाट्याने सहाशे रुपयांत ही तपासणी करून दिली.
बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चोखर यांनी म्हणाले की, खासगी लॅबचालक जास्त पैसे घेत असल्याची चर्चा असून काही रुग्ण तसे सांगत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गल्हे यांनी खासगी लॅबचालकांना सहाशे रुपयांचा शासन आदेश पोहचविण्याची जबाबदारी ही त्या-त्या प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.

Web Title: Looters from labbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.