दरोडा टाकून पळविलेला कंटेनर चार तासातच केला हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:09+5:302021-03-07T04:19:09+5:30
हरियाणा येथील वाहनचालक हिदायत हनिफ खान हा कंटेनरमध्ये (एचआर ३८-डब्ल्यू ८१२०)मध्ये सात कार घेऊन शुक्रवारी (ता.५) दुपारी चारच्या ...

दरोडा टाकून पळविलेला कंटेनर चार तासातच केला हस्तगत
हरियाणा येथील वाहनचालक हिदायत हनिफ खान हा कंटेनरमध्ये (एचआर ३८-डब्ल्यू ८१२०)मध्ये सात कार घेऊन शुक्रवारी (ता.५) दुपारी चारच्या सुमारास दिल्लीहून गोव्याला जाताना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव टोलनाक्याजवळ चहापानासाठी थांबला होता. तो वाहनातील टायरमधील हवा तपासत असताना काळ्या रंगाच्या बुलेटवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्याला कटरचा धाक दाखवत शिवीगाळ करायला सुरुवात केली. याच दरम्यान त्या इसमाने इतर चौघांना तेथे बोलावून घेत संबंधित वाहनचालकाला दमदाटी करुन त्याच्या ताब्यातील कंटेनर, त्याच्या खिशातील २ हजार ५०० रुपये रोख आणि एटीएम कार्ड व मोबाइल घेऊन तेथून पोबारा केला.
चालकाने १०० क्रमांकावर फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली.
नियंत्रण कक्षाला तक्रार प्राप्त होताच त्याची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना देण्यात आली.
उपविभागीय अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह सहायक फौजदार इस्माईल शेख, बाबा खेडकर, राजेंद्र घोलप, यमना जाधव, ओंकार शेंगाळ, शिवाजी डमाळे, दत्तात्रय मेंगाळ, अशोक गायकवाड, नित्यानंद बापूगिरी गोसावी, अमोल दत्तू बुरकूल यांनी तपास सुरू केला.
खातरजमा होताच पोलीस पथकाने रात्री दीडच्या सुमारास छापा घालत अखलाक असीम उर्फ अखलाक असीफ शेख (रा.खलीलपुरा, कागदीपुरा, ता.जुन्नर, जि. पुणे, कुरण, ता.संगमनेर) याला अटक केली. त्याच्याकडून दरोडा
घालून पळवून नेलेला कंटेनर, त्यातील सात नवीन वाहने, कंटेनर चालकाकडून लुबाडलेले अडीच हजार रुपये, एटीएम कार्ड आणि मोबाइल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह अन्य चौघांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार आय.ए. शेख करत आहेत.