लोणी खुर्दला चोरट्यांनी दोन घरे फोडली : दीड दोन लाखांचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 18:46 IST2019-05-28T18:45:38+5:302019-05-28T18:46:36+5:30
लोणी खुर्द (ता.राहाता) येथील विद्यानगर वसाहतीत एका बंगल्यात असलेल्या दोन घरांच्या कडी, कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार तोळे सोन्याचे दागिने आणि २७ हजार रुपये रोख असा दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.२७) मध्यरात्री घडली.

लोणी खुर्दला चोरट्यांनी दोन घरे फोडली : दीड दोन लाखांचा ऐवज लांबविला
लोणी : लोणी खुर्द (ता.राहाता) येथील विद्यानगर वसाहतीत एका बंगल्यात असलेल्या दोन घरांच्या कडी, कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार तोळे सोन्याचे दागिने आणि २७ हजार रुपये रोख असा दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.२७) मध्यरात्री घडली.
मोहन अनाप (रा.सोनगाव ता.राहुरी) यांच्या मालकीच्या बंगल्यात लक्ष्मण भाऊ उगलमुगले (रा.खळी,ता.संगमनेर) व अमजद बालेखान पठाण (रा.हसनापूर,ता.राहाता) या दोघांचेही कुटुंब आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. यातील उगलमुगले हे शिक्षक आहेत. तर पठाण हे सुतार काम व्यावसायिक आहेत. सध्या उन्हाळी सुटी असल्याने हे दोन्ही कुटुंब आपआपल्या गावी गेलेले होते. नेमकी हिच संधी शोधत सोमवारी (दि.२७) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हे दोन कुटुंब राहत असलेल्या घरांच्या दरवाज्यांचे कडी-कोयंडे कटरच्या साह्याने तोडत घरात प्रवेश केला. घरातील कपाटाची उचकापाचक करीत उगलमुगले यांच्या कपाटातील पंधरा हजार रुपये रोख व तीन तोळे वजनाने गंठण तसेच पठाण यांच्या घरातील कपाटाची उचकापाचक करून दीड तोळ्याचे गंठण व बारा हजार रुपये घेऊन या ठिकाणाहून पोबारा केला.
दरम्यान मंगळवारी सकाळी या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी लागलीच ही बाब उगलमुगले व पठाण कुटुंबीयांना कळविली. या घटनेनंतर शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाच्या साह्याने या अज्ञात चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता घटनास्थळापासून दक्षिणेस दोन कि.मी. वर असलेल्या बाभळेश्वर रस्त्यापर्यंत या श्वान पथकाने माग काढला. याठिकानाहून हे चोरटे एखाद्या वाहनाने पसार झाले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे. लोणी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.