संगमनेर : शेततळ्यात पडलेल्या दोन अल्पवयिन मुलांना एका १४ वर्षे वयाच्या बालकाने स्वत:चा जीव धोक्यात घालून सुखरूप बाहेर काढले़ ही घटना संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे गुरूवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.सावरगावतळ येथे इयत्ता दुसरीत शिकत असलेला चिमुकला अनिकेत सोमनाथ फापाळे (वय ८) हा घरासमोरच असलेल्या ३० फूट खोल पाण्याने पूर्ण भरलेल्या शेततळ्याजवळ खेळत होता. खेळत असताना पाय घसरून तो शेततळ्यात पडला़ जवळच असलेला नववीतील त्याचा भाऊ अतुल ( वय १५) याने अनिकेतला वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचाही तोल जाऊन तोही तळ्यात पडला. दोघांनाही पोहता येत नसल्याने गटांगळ्या खाऊन दोघेही पाण्यात बुडू लागले़ बचावासाठी प्रयत्न करू लागले़ त्यांची आई गीता फापाळे ही शेतात कामाला गेलेली असल्याने घरी दुसरे कोणीही नव्हते. वयोवृद्ध आजी वेणूबाई हिने आपले नातू शेततळ्यात पडल्याचे पाहून मदतीसाठी आरडाओरड सुरु केली. काही अंतरावर वस्ती असलेल्या कुणाल विक्रम फापाळे याने मदतीसाठी दिलेला आवाज ऐकून जोरात शेततळ्याकडे धाव घेतली. त्याने क्षणाचाही विलंब न करता तळ्यात उडी मारली. कुणाल याने अनिकेतला पकडून कडेला आणले़ त्याला कडेला सोडून पुन्हा पाण्यात सुळकी घेत अतुललाही पकडून कडेला आणले. त्यावेळी इतरही काही लोक मदतीसाठी धावले होते होते़ मात्र तोपर्यंत कुणालने दोघाही भावंडाना सुखरूपपणे तळ्याच्या कडेला आणले होते़ नंतर इतर ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने दोघाही भावंडाना तळ्याच्या बाहेर काढले. कुणालने दाखविलेल्या या शौर्याबद्दल त्याचे गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे, उपसरपंच शिवनाथ नेहे, तंटामुक्ती अध्यक्ष परशराम नेहे, मुख्याध्यापिका दिप्ती आडेप, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष जाधव, ग्रामसेवक चांगदेव दरेकर, भिकाजी नेहे, शांताराम नेहे यांनी कौतुक केले.(तालुका प्रतिनिधी)
दोन भावंडांना कुणालने दिले जीवनदान
By admin | Updated: September 10, 2016 00:23 IST