श्रीगोंद्यातील कोरोनाबाधितांच्या देवदूताची एकाकी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:21 IST2021-04-20T04:21:13+5:302021-04-20T04:21:13+5:30
श्रीगोंदा : येथील डॉ. संतोष अंबरनाथ हिरडे यांनी स्वत:चे हाॅस्पिटल कोरोना रुग्णांसाठी खुले केले असून, अगोदर उपचार आणि नंतर ...

श्रीगोंद्यातील कोरोनाबाधितांच्या देवदूताची एकाकी झुंज
श्रीगोंदा : येथील डॉ. संतोष अंबरनाथ हिरडे यांनी स्वत:चे हाॅस्पिटल कोरोना रुग्णांसाठी खुले केले असून, अगोदर उपचार आणि नंतर शासकीय दरापेक्षा कमी बिल अशा प्रकारे ते रुग्णसेवा करत आहेत. गोरगरीब रुग्णांवर ते मोफत उपचार करीत असून त्यांच्याकडे आलेल्या सर्व कोरोनाबाधितांना त्यांनी जीवदान दिले आहे. कोविडमुळे हॉस्पिटलमधील अनेक कर्मचारी नोकरी सोडून गेले असले तरी या देवदूताची कोरोनाबाधितांना वाचविण्यासाठी एकाकी झुंज सुरू आहे.
संतोष हिरडे यांनी चार वर्षांपूर्वी तालुक्यात रुग्णांना सेवा देण्याच्या हेतूने श्रीगोंदा शहरात मोरेदादा मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल सुरू केले. कोरोनाची महामारी आली आणि हाॅस्पिटलमधील कर्मचारी सोडून गेले.
अशा परिस्थितीत डॉ. हिरडे यांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्याच्या निर्णय घेतला. गेल्या वर्षभरापासून हाॅस्पिटलमध्ये कोरोनाचे ५० ते ६० रुग्ण असतात. दररोज १८ ते २० तास ते स्वत: मेहनत घेऊन सेवा देतात.
रुग्ण आला की पैसे आहेत की नाही याचा विचार न करता अगोदर उपचार चालू करतात. सलाईन, ऑक्सिजन इतर सेवा स्वत: देतात. रुग्ण बरा झाला की ते शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी बिल आकारणी करतात. एखादा गरीब रुग्ण असला तर फक्त औषधाचे पैसे घेऊन त्या रुग्णास सेवा देतात. आतापर्यंत अशी त्यांनी ३२ रुग्णांची मोफत सेवा केली आहे.
त्यांनी आतापर्यंत एकूण ५०० कोविड रुग्णांवर उपचार केले आहेत. यामधील सर्व रुग्णांचे जीव वाचविण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी केली आहे.
--
श्रीगोंद्यात सेवाभावी वृत्तीने परमपूज्य मोरेदादा नावाने हाॅस्पिटल सुरू केले. परंतु काही अडचणी निर्माण झाल्या. हिम्मत हरलो नाही. कोराेना महामारीच्या संकटात कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्याच्या भावनेने काम सुरू केले. सध्या हॉस्पिटलमध्ये एकटाच असल्याने कामाचा ताण असतो. मात्र, सेवेतून समाधान मिळत आहे.
-डॉ. संतोष हिरडे,
श्रीगोंदा
-----
आमच्या कुटुंबातील काही सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. डॉ. संतोष हिरडे यांनी सर्वांवर उपचार केले. शासकीय दरापेक्षा कमी बिल घेतले. त्यांचा व्यवसायात सेवाभाव दिसून आला.
-सुनील तुकाराम दरेकर,
श्रीगोंदा
--१९ डॉक्टर हिरडे