Lok Sabha Election 2019 : शिर्डीत शिवसेनेकडून खासदार सदाशिव लोखंडे रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 16:30 IST2019-03-22T16:29:48+5:302019-03-22T16:30:03+5:30
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने खासदार सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Lok Sabha Election 2019 : शिर्डीत शिवसेनेकडून खासदार सदाशिव लोखंडे रिंगणात
श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने खासदार सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सेनेकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नाशिकचे माजी मंत्री बबनराव घोलप हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र, पक्षाने विद्यमान खासदारांवर पुन्हा विश्वास दाखविला आहे. काँग्रेसने श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना रिंगणात उतरविले असल्याने आता लोखंडे विरुध्द कांबळे यांच्यात लढत रंगणार आहे.
शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. शिर्डी मतदारसंघासाठी अखेरच्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, पक्षाने पहिल्याच यादीत येथील उमेदवाराची घोषणा देत चर्चेला पूर्णविराम दिला. येथे आता कांबळे यांच्यानंतर लोखंडे, बहुजन वंचित आघाडीचे डॉ.अरुण साबळे, भाकपचे कॉ.बन्सी सातपुते, स्वाभिमानीचे संतोष रोहोम हे उमेदवारी आजअखेर घोषित झाले आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील महिन्यात शिर्डी येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लोखंडे यांची उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान, पक्षाच्या मतदारसंघातील बैैठकांमधून लोखंडे यांना झालेला विरोध पाहता त्यांच्या उमेदवारीवरून अनेक तर्कवितर्क केले जात होते. खासदार लोखंडे हे गेल्या दोन महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
अवघ्या १३ दिवसांत लोखंडे खासदार
मागील लोकसभा निवडणुकीत बबनराव घोलप यांना सेनेने उमेदवारी दिली होती. मात्र, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने घोलप यांना उमेदवारी गमवावी लागली होती. त्याचवेळी कोपरगावचे आमदार अशोक काळे यांनी लोखंडे यांना शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची गळ घातली. त्यांना मातोश्रीवर नेत उमेदवारीही निश्चित केली. शिर्डी मतदारसंघाची काहीही माहिती नसताना अवघ्या १३ दिवसांत लोखंडे हे निवडणूक लढवून मोदी लाटेत ते खासदार झाले.