लोहसर ग्रामपंचायत राज्यभर राबवतेय ‘स्मृती वृक्ष’ योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 18:06 IST2017-03-31T18:06:11+5:302017-03-31T18:06:11+5:30
लोहसर (ता. पाथर्डी) ग्रामपंचायतीच्या वतीने राज्यभर ‘स्मृती वृक्ष’ (दत्तक वृक्ष) अशी एक नवी संकल्पना राबविण्यात येत आहे.

लोहसर ग्रामपंचायत राज्यभर राबवतेय ‘स्मृती वृक्ष’ योजना
आॅनलाइन लोकमत
अनिल लगड, अहमदनगर, दि. ३१ - आदर्श गावाकडे वाटचाल करणाºया व ‘ग्रीन व्हिलेज’ संकल्पना राबवित असलेल्या लोहसर (ता. पाथर्डी) ग्रामपंचायतीच्या वतीने राज्यभर ‘स्मृती वृक्ष’ (दत्तक वृक्ष) अशी एक नवी संकल्पना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून, एकाच दिवसांत ३२ हजार रुपये जमा झाले असून, आठ दिवसांत दोन ते अडीच लाख रुपये जमा होतील, अशी माहिती सरपंच अनिल गिते पाटील यांनी दिली.
लोहसर-पवळवाडी ग्रामपंचायतीला नुकताच वनखात्याचा वनग्राम पुरस्कार मिळाला आहे. लोहसरला ‘स्मृती वृक्ष’ (दत्तक वृक्ष) अशी एक नवी संकल्पना राबवत आहे. गाव अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या वृक्षांची त्यामध्ये निवड केली आहे. एक झाड, सिमेंट कुंडी, रंग, आपल्या नावाचा फलक, लागवड खर्च व ठिबक असा एकूण २००० रुपये खर्च येतो. या योजनेत ५० टक्के रक्कम देऊन प्रतिझाड १००० देणगी देऊन सहभागी होऊ शकता. ५० टक्के खर्च ग्रामपंचायतीचा असेल. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च, लग्नातील सत्काराचा अनावश्यक खर्च किंवा घरातील मृत व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ यासाठी राज्यातील कोणतीही व्यक्ती मदत देऊ शकते. आपल्या पिढीभर त्या वृक्षावर आपले नाव, आपल्या आठवणी, स्मृती जाग्या राहतील. या योजनेत किमान दोन, तीन ‘स्मृती वृक्ष’ दत्तक घेऊन (२ ते ३ हजार रुपये) देणगी देऊन सहभाग नोंदवू शकता. या योजनेची स्वतंत्र सक्षम व नि:स्वार्थीपणे अविरत काम करणारी समिती असून, सदर समिती लोहसर गाव अंतर्गत असलेले वृक्ष व लोहसर वनातील वृक्ष यांची देखभाल व येणाºया निधीचा पारदर्शक (जमा खर्च) कारभार करते. या योजनेत महाराष्ट्रातील कुठलीही व्यक्ती सहभाग घेऊ शकते, ग्रामपंचायतीच्या वतीने त्या दात्याचा स्मृतिचिन्ह देऊन उचित सन्मान केला जाईल. तरी ‘ग्रीन व्हिलेज’ लोहसर या संकल्पनेला आपल्या अनमोल सहभागाची व या कायार्तून होणाºया निसर्ग संवर्धनाची ग्रामस्थांना अपेक्षा आहे.
सदर संकल्पना राज्यातील सर्व गावात राबविणे शक्य आहे. इतर गावातही अशा योजना राबविता येतील यासाठी याचा प्रसार-प्रचार होण्यासाठी योजनेत आर्थिक स्वरूपात सहभागी होता आले नाही तरी चालेल, परंतु हा संदेश सर्व सोशल मीडियावर पाठवावा. आम्ही आपले कृतज्ञ राहू, असे सरपंच अनिल गिते यांनी सांगितले़
लोहसर ग्रामपंचायतीने सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानुसार एकाच दिवसात ३२ हजार रुपये रक्कम समितीच्या नावावर जमा झाली आहे. देणगीदारांची नावे अशी-सुनील हरिश्चंद्र दरे (नगर)-२०००, प्रशांत गिते (मुंबई)-१०००, अक्षय भालेराव (नगर)-२०००, नवनाथ पालवे-१०००, अक्षय दगडखैर-२०००, अभिजित मराठे-२०००, जयप्रकाश गिते-२०००, विष्णू बडे (बीड)-२०००, जितेंद्र (पूर्ण नाव माहिती नाही-मुंबई)-५०००, दीपक चन्ने-१०००, ज्ञानेश्वर चव्हाण (मुंबई)-२०००,घनश्याम पित्रोदा-२०००, नवनीत सुरपुरीया-२०००,सुनील गर्जे-२०००, अजय बोरा-२०००, सौरभ बोरकर- २००० अशी जवळपास २२ हजार रुपये, तर आजपर्यंत २५ हजार रुपये बँकेत जमा झाले आहेत. संयुक्त वन व्यवस्थापन समिती, लोहसर (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) या नावाने शिराळ चिचोंडी येथील सेंट्रल बँक इंडियात खाते उघडण्यात आले आहे. खाते नंबर ३५९३५०९९०६ असा आहे. बँकेचा आयएफएससी कोड-सीबीआयएन0-२४२२९५ असा आहे. आठ दिवसांत सुमारे दीड ते दोन लाख रुपये जमा होण्याचा अंदाज सरपंच अनिल गिते यांनी व्यक्त केला आहे. संपर्कासाठी ९५११५५२२२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे.